अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला सीमा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येणार असून भविष्यात सीमाप्रश्नासंदर्भात गंभीर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. आम्ही मराठी भाषिकांसाठी सदैव पाठीशी आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
चंदगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन-सन्मान यात्रेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सांबरा विमानतळावर सीमावासीयांनी भेट घेतली. यावेळी मुतगा येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी सीमा प्रश्नाबद्दल विचारणा केली. सध्या सीमा भागात मराठी भाषिकांवर मोठा अन्याय होत आहे. सीमा प्रश्न मार्गी लागावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून बेळगाव सीमा भागातून लढा सुरू आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला अनेक निवेदने दिली आहेत. अनेक नेत्यांची चर्चा करून सीमा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच तोडगा काढावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.