देवदासी पद्धतीच्या निर्मूलनासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथील शोभा गस्ती यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन नारी शक्ती हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी नारी शक्ती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
‘मला या सन्मानाची अपेक्षा नव्हती. या पुरस्कारामुळे माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. विशेषत: देवदासी कुटुंबातील महिलांच्या उन्नतीसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन,’ असे त्यांनी सांगितले.
देवदासी पद्धतीला आळा घालण्यासाठी शिक्षण हाच मुख्य उपाय असल्याचे गस्ती यांनी सांगितले. ग्रामीण कुटुंबांना , देवदासींना तसेच त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सक्षम केले पाहिजे. असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रीय व्यासपीठावर त्यांच्या कार्याचा विचार केला गेला आणि महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना सर्वात मोठा सन्मान देण्यात आला आहे.ही संपूर्ण जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब ठरली आहे.