डीसीसी बँकेच्या मुरगोड शाखेमध्ये लूट करणाऱ्या तिघांना गजाआड करण्यात बेळगाव जिल्हा पोलिसांना यश आले आहे. पैसे आणि दागिने लुटून कार्यभार साधणाऱ्या तिघा चोरट्यांना पोलिसांनी अटक करून कारवाई केली आहे.
या चोरी प्रकरणी कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला असून चोरट्यांच्या टोळक्यात या बँकेतील क्लार्क चा प्रमुख सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे .यामुळे क्लार्क सह त्याच्या इतर साथीदारांना ही अटक करण्यात आली आहे.
या बँकेचा क्लार्क बसवराज
हुनशीकट्टी (वय 30), त्याचा साथीदार संतोष कंबार (वय 31) आणि आणखी एक साथीदार गिरीश बेलवल (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अटक करण्याबरोबरच पोलिसांनी चोरट्यांनी लुटलेला सारा मुद्दे मालही जप्त केला आहे. सुमारे साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम आणि तब्बल तीन किलो वजनाचे सुमारे दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. यामुळे लूट प्रकरणात नाहीसा झालेला सारा मुद्देमाल पुन्हा डीसीसी बँकेला प्राप्त झाला आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे.
बँकेच्या कोणत्या लॉकरमध्ये पैसे ठेवले जातात ,कोणत्या ठिकाणी दागिने ठेवले जातात याची पूर्ण कल्पना असलेल्या क्लार्कने आपल्या मित्रांच्या साथीने बँक लुटली होती. आपल्याला काही माहीत नसल्याचा आव आणण्यात आला होता .मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे योग्यरितीने फिरवल्यामुळे खरे चोरटे लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यश आले आहे.