राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गोव्यात प्रचंड मोठी धामधूम सुरू आहे. कर्नाटकातील बरेचसे राष्ट्रीय नेते गोव्यात दाखल होऊन आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचे प्रचार करू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी महापौर विजय मोरेही काही उमेदवारांच्या प्रचारासाठी गोव्यात दाखल झाले असून गोवा गाजवू लागले आहेत.
स्वतः काही उमेदवारांची निवड करून विजय मोरे यांनी प्रचार सुरू केला आहे . प्रियोळ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदीप निगळे, गोवा राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर तसेच क्रिकेटच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून राजकारणात आलेले,बेळगावच्या अनेक क्रिकेट खेळाडूंना आधार दिलेले आणि गोव्याचे माजी सभापती राजेश पाटणेकर यांच्या प्रचाराची धुरा विजय मोरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
त्या तिघांच्या प्रचाराच्या संदर्भात विजय मोरे गोव्याला गेले असता याचे नेमके कारण काय हे विचारण्यासाठी बेळगाव केसरी ने त्यांच्याशी संपर्क साधला असता हे तिघेही चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे अशा व्यक्ती राजकारणात निवडून येण्याची गरज असून गोव्याच्या विधानसभेत त्यांना नागरिकांनी निवडावे, या एकाच हेतूने आपण स्वतः गोव्यामध्ये दाखल झालो असल्याची माहिती विजय मोरे यांनी दिली आहे.
गोवा आणि बेळगाव चे नाते अतिशय दृढ आहे. गोव्यातील नागरिकाला बेळगाव शिवाय कोणतेही काम चालत नाही. रुग्णावर उपचार असोत खरेदी असो किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये गोव्याचे नागरिक बेळगाव वर आणि पर्यटन आणि इतर कामासाठी बेळगावकर नागरिक गोव्यावर अवलंबून असतात. या सामाजिक नात्यातूनच विजय मोरे यांचा या उमेदवारांशी संपर्क आला आहे. यापैकी राजेश पाटणेकर हे भाजप पक्षाचे उमेदवार असले तर एक मित्र म्हणून मी त्यांचा प्रचार करत असल्याचे मोरे यांनी सांगितले.
संदीप निगळे हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये होते. तिकीट देताना त्यांच्या नावाचा विचार केला गेला नाही तर निगळे यांच्यासारखा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता निवडून यायला हवा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक पावसकर यांनी बेळगाव आणि गोवा चा मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारात आपण आघाडी घेतली असल्याचेही विजय मोरे यांनी बेळगाव केसरी शी बोलताना सांगितले.