प्रादेशिक सेनेतर्फे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या सैन्य भरती प्रक्रियेत भाग घेतलेल्या युवकांना फळांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते आर. एम. चौगुले यांनी यासाठी पुढाकार घेतला.
४ नोव्हेंबर पासून बेळगावात सैन्य भरती सुरू असून विविध राज्यातून आलेल्या युवकांची शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. कालपासून शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी लष्करांकडून सुरू झाली आहे. १६ नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया असणार आहे. या मार्गावरून रोज ये-जा करताना रस्त्यावर झोपणारी व अन्नपाण्यासाठी फिरणाऱ्या युवकांना पाहून आर. एम. चौगुले यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित असलेल्या युवकांना आज त्यांनी केळी, सफरचंद आदी फलाहार दिला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल युवकांनी समाधान व्यक्त केले.