कुद्रेमनी येथे ‘सावित्रीबाई फुले महिला मंडळ’ आणि’ निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी समाज सेवा संस्था’ कुद्रेमनी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकू आणि जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सावित्री न मनाने झाली .कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्षा सौ.लता अर्जुन जांबोटकर ,प्रमुख वक्त्या डॉ.सविता कद्दू , सत्कारमूर्ती डॉ.सविता देगीनाळ, प्रमुख अतिथी सौ. प्रीती राजू चौगुले ,सौ.रेखा मदन बामणे ,सौ सिंधू ईश्वर गुरव ,सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.अश्विनी जांबोटकर, ग्रामपंचायत सदस्या आरती सुतार उपस्थित होत्या.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून’ झाडे लावा झाडे जगवा ‘हा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत ‘निर्मिती’ ग्रामीण अभिवृद्धी समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मधुरा गुरव (मोटराचे) यांनी केले संस्था कशा कार्यरत आहेत याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर सविता कद्दू यांनी महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करताना ‘चाळीशीनंतर महिलांचे आरोग्य ‘याविषयी माहिती दिली .सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या तरच तुमचे घर सुखी ,समाधानी आणि आनंदी राहील असे सांगितले. स्त्री घरचा वासा असते आणि स्त्रीवर संपूर्ण घर अवलंबून असते .म्हणून प्रथम स्त्रियांनी आरोग्यदायी सुंदर जीवन जगणे कसे जरुरीचे आहे हे सांगत असतानाच गावात सर्वांसाठी आरोग्य शिबीर आयोजन करण्याची ग्वाही दिली.
यावेळी सत्कारमूर्ती डॉ.सविता देगीनाळ यांचा संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला .संजीवनी फाउंडेशन च्या माध्यमातून वृद्धाश्रम चालवणाऱ्या डॉ.सविता देगीनाळ यांचे जीवन महिलांसाठी प्रेरणादायी ठरावे हा उद्देश ठेवूनच हा सत्कार समारंभ आयोजित केला होता.सत्काराला उत्तर देताना डॉ.सविता देगीनाळ यांनी मी सदैव तुमच्या ऋणातच राहणे पसंत करेन असे सांगून आपला जीवन प्रवास आणि वृद्धाश्रमाचे कार्य याविषयी माहिती दिली.
प्रमुख अतिथी सौ.प्रीती राजू चौगुले यांनी महिलांनी समतावादाचा पुरस्कार करत मुलगा मुलगी भेद न करता आपल्या मुलांना समानतेने वागवा. मुलींच्या जन्माचे स्वागत करा .मुलींना शिकवा. स्वावलंबी बनवा असा संदेश दिला.
तसेच रेखा मदन बामणे म्हणाल्या की आम्ही स्त्रिया घरची जबाबदारी चोखपणे पार पडतो .त्यामुळे घरातील पुरुष बाहेर पूर्णवेळ कार्यरत असतात. गृहिणी म्हणून घर सांभाळताना आनंदाने सर्वांना सामावून घ्या .स्वतःतील सुप्त गुण ओळखून कार्य करा असे सांगत मंडळाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला संजीवनी ग्राम वक्कूट, संजीवनी वार्ड वक्कूटचे पदाधिकारी ,सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या पदाधिकारी ,निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी समाज सेवा संस्थेच्या पदाधिकारी आणि गावातील विविध स्व -सहाय्य संघाचे प्रतिनिधी ,शाळेच्या विद्यार्थिनी तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल धामणेकर आणि आभार प्रदर्शन रेणुका गुरव यांनी केले.