मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदु धर्मात संक्रांतीला देव मानले आहे. या दिवशी तीळगुळाचे वाटप करून प्रेमाची देवाण-घेवाण केली जाते. मकरसंक्रांतीचे महत्त्व काही सूत्रांद्वारे समजून घेऊया.
१. तिथी : हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांतीचा दिवस एक दिवसाने पुढे ढकलला जातो.
२. इतिहास : संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे.
३. मकरसंक्रांतीचे व्यावहारिक महत्त्व : भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. या दिवशी इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवाच्या समोर ठेवावा. त्यामुळे तीळगुळातील शक्ती आणि चैतन्य टिकून राहते. तीळगूळ देतांना आपल्यात चैतन्य आणि भाव जागृत होतो. व्यावहारिक स्तरावरील जिवाला घरात असलेल्या वातावरणातील चैतन्याचा लाभ होतो. त्याच्यातील प्रेमभाव वाढतो. त्याला नकारात्मक दृष्टीकोनातून सकारात्मक दृष्टीकोनात जाण्यास साहाय्य होते.
४. मकरसंक्रांतीचे साधनेच्या दृष्टीने महत्त्व : मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे वातावरण जास्त चैतन्यमय असते. साधना करणार्या जिवाला या चैतन्याचा सर्वाधिक लाभ होतो. या चैतन्यामुळे त्या जिवातील तेजतत्त्व वृद्धींगत व्हायला साहाय्य होते. या दिवशी प्रत्येक जिवाने वातावरणातील रज-तम वाढू न देता अधिकाधिक सात्त्विकता निर्माण करून त्या चैतन्याचा लाभ करून घ्यावा. मकरसंक्रांतीचा दिवस साधनेसाठी अनुकूल आहे. त्यामुळे या काळात अधिकाधिक प्रमाणात साधना करून ईश्वर आणि गुरु यांच्याकडून चैतन्य मिळवण्याचा प्रयत्न करावा.
अ. साधनेला अनुकूल काळ : ‘संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो; कारण या काळात ब्रह्मांडात आप, तसेच तेज या तत्त्वांशी संबंधित कार्य करणार्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते.’
५. प्रकाशमय कालावधी : ‘या दिवशी यज्ञात हवन केलेली द्रव्ये ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर देव अवतरित होतात. याच प्रकाशमय मार्गाने पुण्यात्मा पुरुष शरीर सोडून स्वर्गादी लोकी प्रवेश करतात; म्हणून हा कालावधी प्रकाशमय मानला गेला आहे.
६. या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे महत्त्व : या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे अथवा तीळ-तांदूळ मिश्रित अघ्र्य अर्पण करण्याचेही विधान आहे. या पर्वाच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. तिळाचे उटणे, तीळमिश्रित पाण्याचे स्नान, तीळमिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर, तसेच तिळाचे दान हे सर्व पापनाशक प्रयोग आहेत; म्हणून या दिवशी तीळ, गूळ, तसेच साखरमिश्रित लाडू खाण्याचे, तसेच दान करण्याचे अपार महत्त्व आहे. ‘जीवनात सम्यव्â क्रांती आणणे’, हे मकरसंक्रांतीचे आध्यात्मिक तात्पर्य आहे.
७. मकरसंक्रांतीला दिलेल्या दानाचे महत्त्व : धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते.
अ. दानाच्या वस्तू : ‘नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तीळगूळ देतात.’ सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात.
८. वाण देण्याचे महत्त्व : ‘वाण देणे’ म्हणजे दुसर्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते.
अ. वाण कोणते द्यावे ? : सध्या साबण, प्लास्टिकच्या वस्तू यांसारख्या अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयक ध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.
९. सुगड: ‘संक्रांतीच्या सणाला ‘सुगड’ लागतात. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदीकुंकू इत्यादी भरतात. रांगोळी घालून पाट मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात.’
१०. निषेध : संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष आणि गवत तोडणे आणि लैंगिक भावना उद्दीपीत होणार्या कृती करणे टाळावे.
११. प्राकृतिक उत्सव : हा प्राकृतिक उत्सव आहे, प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव आहे. दक्षिण भारतात तामीळ वर्षाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. तेथे हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकरसंक्रांत’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते.
१२. जीवनाकडे साक्षीभावाने पाहण्यास शिकवणारा सूर्याचा उत्सव : सूर्याच्या उत्सवाला ‘संक्रांत’ असे म्हणतात. कर्वâसंक्रांतीनंतर सूर्य दक्षिणेकडे जातो आणि पृथ्वी सूर्याच्या जवळ, म्हणजे खाली जाते. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो आणि पृथ्वी सूर्यापासून दूर, म्हणजे वर जाते. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. कोणत्याही ग्रहमालेतील कोणत्याही ग्रहाचे मध्यबिंदूकडे जाणे, म्हणजे ‘खाली जाणे’ आणि मध्यबिंदूपासून लांब जाणे, म्हणजे ‘वर जाणे.’ कर्वâवृत्ताकडून मकरवृत्ताकडे जाणे, म्हणजे वरून खाली जाणे अन् मकरवृत्ताकडून कर्वâवृत्ताकडे जाणे, म्हणजे खालून वर जाणे.
मकरसंक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव; म्हणून तो महत्त्वाचा मानला आहे. पृथ्वीच्या सूर्याजवळ आणि सूर्यापासून दूर जाण्याचा जसा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही, तसेच मानवाने त्याच्या जीवनात येणार्या चढउतारांकडे, सुख-दुःखांकडे समत्व दृष्टीने, साक्षीभावाने पाहायला हवे, असाच संदेश जणू संक्रांतीच्या उत्सवातून मानवाला मिळाला आहे.’
१३. पतंग उडवू नका ! : सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना मनोरंजनासाठी पतंग उडवणे म्हणजे ‘रोम जळत असतांना नीरो फिडल वाजवत होता’, त्याप्रमाणे आहे. पतंग उडवण्याचा वेळ राष्ट्राच्या विकासासाठी वापरला, तर राष्ट्र लवकर प्रगतीपथावर जाईल आणि साधना अन् धर्मकार्य यांसाठी वापरला, तर स्वतःसह समाजाचेही कल्याण होईल.’
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते : संकलक ; श्री आबासाहेब सावंत
संपर्क : 7892400185