बेळगाव
सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या शाकंभरी पोर्णिमा यात्रा आज मोठ्या भावात संपन्न होत आहे.
शाकंभरी पौर्णिमा यात्रा साठी कर्नाटक ,महाराष्ट्र, गोवा ,आंध्र प्रदेश तसेच केरळ येथून तब्बल सात लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी आले आहेत.
आज गुरुवार दिनांक 25 जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. लाखोंच्या संख्येने भाविक आल्यामुळे देवी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.यात्रा काळात होणारी प्रचंड गर्दी पाहून मंदिर प्रशासनाच्यावतीने भक्तांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असली तरीही, भाविकांना बऱ्याच ठिकाणी अडचणींचा ही सामना करावा लागत आहे.
मोठ्या संख्येने भाविक शाकंभरी यात्रेला आले आहेत. भाविकांनी शांत आणि शिस्तबदरीत्या देवी दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिराचे कार्यकारी अधिकारी एस. पी. बी. महेश यांनी केले आहे. आई उदो चा गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण यल्लमा डोंगरावर पाहायला मिळत आहे.
बेळगाव जिल्हा, कोल्हापूर,सांगली, सातारा,गोवा, आणी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना सह केरळ येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीच्या दर्शनाला वर्षभर भाविकांची गर्दी असते.यामध्ये ही प्रामुख्याने
जानेवारी महिन्यातील शाकंभरी पौर्णिमा यात्रेला सौंदत्ती डोंगरावर रेणुका भक्तांची सर्वात मोठी उपस्थिती दिसून येत असते.रेणुका देवीच्या यात्रेला महाराष्ट्र बरोबरच उत्तर कर्नाटकातील रेणुका भक्तही मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रेला यल्लमा डोंगरावर लाखोंच्या संख्येने देवी दर्शनाला येत असतात.
आज यात्रेचा मुख्य दिवस आहे आज पहाटे देवीला अभिषेक, पूजा आरती करण्यात आल्यानंतर मंदिर देवी दर्शनासाठी खुले करण्यात आले. सायंकाळी ही अभिषेक पूजा आरती होणार आहे त्यानंतर पालखी सोहळा पार पडेल.
शाकंभरी पोर्णिमा यात्रेसाठी मंदिर प्रशासनाने प्रचंड संख्येने येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीची दक्षता घेत विविध उपाययोजना,व्यवस्था आदी कामे हाती घेण्यात येत असतात.
तब्बल आठ ते दहा लाख भाविक देवी दर्शनासाठी डोंगरावर येथील याकडे लक्ष देऊन यात्रेनिमित्त पिण्याचे पाणी,स्वच्छता,पथदीप, पोलीस बंदोबस्त, दर्शन व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. भाविकांना मंदिराबाहेर देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी भव्य एलईडी स्क्रीन दोन ठिकाणी बसविण्यात आले आहेत.
40 छोट्या तर पाच मोठ्या टाक्यांच्या आधारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. डोंगरावर विविध ठिकाणी पाण्याचे नळ बसविण्यात आले आहेत. स्वच्छतेसाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सौंदत्ती डोंगरावरील सर्व पथदीपांची दुरुस्ती करण्यात आली आहे.संपूर्ण डोंगरावर प्रकाश व्यवस्था, त्याचबरोबर मोठी गर्दी होणाऱ्या स्नानकुंड,डोंगरावर येण्यासाठी असलेले ३ नाके आणि समाजकंटक आणी चोरट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
यात्राकाळात डोंगरावर वाहनांची होणारी प्रचंड गर्दी होते, याकडे लक्ष देऊन विविध निर्धारित ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेत यात्रा काळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रा काळात भाविकांना आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय सेवा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक भाविक बैलगाड्या घेऊन यात्रेला येत असतात त्याचीही काळजी घेत जनावरांचा दवाखाना आहे डोंगरावर उभारण्यात आला आहे.