बेळगाव – बेंगलोर येथे नुकतेच कर्नाटक मराठा विकास महामंडळाच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यभरातील मराठा समाज बांधवांनी प्रचंड संख्येने उपस्थिती दर्शविली होती. या कार्यक्रमात बेळगांव ग्रामीणमधील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी अध्यक्ष विनय विलास कदम यांच्याकडून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे भव्य तैलचित्र प्रदान करण्यात आले.
गेली दोन दशके विनय विलास कदम हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय एकनिष्ठ सदस्य आहेत. बेळगाव ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी विनय कदम यांनी निरंतर काम केले आहे. त्याचबरोबर बेळगाव भागातील मराठा समाजाच्या विविध प्रकारच्या उपक्रम उपक्रमात विनय कदम यांचा सक्रिय पुढाकार असतो. बेंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा विकास महामंडळाच्या कार्यालय उद्घाटनाप्रसंगी विनय कदम आपल्या शेकडो समर्थकांसमवेत कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विनय कदम यांच्या मण्णूर गावातील झांज पथकाने कार्यक्रमात जोश भरण्याचे काम केले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मराठा विकास महामंडळाच्या कार्याला गती देण्याचे काम केल्याबद्दल विनायक कदम यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य तैलचित्राची भेट देऊन आभार व्यक्त केले.