संत तुकाराम महाराजांच्या बुद्धीची सूक्ष्मता-
साधना केल्यानंतर आपली बुद्धी सूक्ष्म होते; म्हणजे आपल्याला पंच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धीच्या पलिकडच्या संवेदनांची जाणीव होते. काही संत व्यक्तीच्या भूतकाळाविषयी अथवा भविष्यकाळाविषयी सांगतात. यालाच सूक्ष्म ज्ञान असे म्हणतात. आपण या प्रसंगाच्या माध्यमातून सामान्य मनुष्यासारखे दिसणारे तुकाराम महाराज यांनी जनहितासाठी या ज्ञानाचा उपयोग कसा केला, या विषयी जाणून घेऊया.
संत तुकाराम महाराज देहू या गावी रहात होते. एक दिवस त्या गावात एक साधू येणार असल्याची वार्ता पसरली. साधूंच्या स्वागतासाठी गावकर्यांनी मोठा मंटप घातला. त्यांचे दर्शन घेण्यासाठी पुष्कळ लोक गोळा झाले होते. सर्वजण त्यांची स्तुती करत होते. त्या साधूच्या दर्शनाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील, अशी वार्ता गावभर पसरली होती. गावात साधू प्रत्यक्ष आल्यावर प्रत्येक जण त्यांच्या दर्शनाला जाऊन दक्षिणा देऊन, विभूती आणि प्रसाद घेऊ लागले. गावातील लोक ‘घरात लक्ष्मी वास करूदे, शेतात धान्य भरपूर येऊदे, विहिरीत पाणी येऊदे,’ अशा अनेक व्यावहारीक अडचणी साधूला विचारत होते. साधू डोळे मिटून बसत असे. येणारे लोक त्यांच्या पायावर डोके ठेवून आपल्या अडचणी सांगायचे. अडचणी ऐकल्यावर तो साधू त्यांना विभूती लावायचा. त्यासाठी लोकांना त्याना दक्षिणा द्यावी लागत होती. त्यानंतर तो साधू त्यांना आशीर्वाद द्यायचा.
तुकाराम महाराजांना ही वार्ता समजली, तेव्हा त्यांनी त्या साधूचे दर्शन घ्यायचे ठरविले. साधूच्या दर्शनासाठी लोकांची पुष्कळ गर्दी झाली होती. तुकाराम महाराज त्या गर्दीत सावकाश वाट काढत त्या साधूच्या समोर येऊन बसले. साधू डोळे मिटून आरामात बसला होता. अर्धा घंटा झाला तरी त्यानी डोळे उघडले नाही. लोक ‘साधू केव्हा डोळे उघडेल आणि त्याची दिव्य दृष्टी केव्हा पडणार’; यासाठी कुतूहलाने वाट पहात होते. तुकाराम महाराजांना तर या साधूविषयी पूर्ण कल्पना होती.
काही वेळा नंतर त्या साधून डोळे उघडले. डोळे उघडताच समोर संत तुकाराम महाराज बसलेले दिसले. त्याने तुकाराम महाराजांना विचारले की, तुम्ही केव्हा आलात ? लगेच संत तुकाराम महाराज म्हणाले की, तुम्ही जेव्हा डोळे मिटून मनात विचार करत होता की, हे गाव छान आहे. इथली भूमी देखील सुपीक आहे आणि मळ्यासाठी पूरक आहे. इथले लोक आम्हाला पुष्कळ मान देत आहेत. पुष्कळ देणग्या देखील देत आहेत. त्या पैशातून इथली भूमी विकत घेऊन इथे ऊस लावला तर त्याचे पीक चांगले येईल, त्यातून आपल्याला मोजता येणार नाहीत, इतके पैसे मिळतील. ते पैसे तुम्ही मोजत बसले होतात, तेव्हा मी इथे आलो. हे बोलणे ऐकून त्या ढोंगी साधूचा तोंडवळा पडला. त्याच्या तोंडातून एक अक्षर देखील बाहेर पडले नाही. या गावात आता आपली स्थिती कशी होईल, याची त्याला जाणीव झाली. तो दुसर्या दिवशी सूर्याेदयाच्या आधी आपले चंबूगबाळे आवरून कोणालाही न सांगता तेथून पसार झाला.
वाचकहो, पहा. कपट कसे बाहेर पडते ! ईश्वर बोलत नाही; परंतु ईश्वराचे सगुणरूप असलेले संत बोलू शकतात. संत योग्यरीतीने ओळखतात. संत तुकाराम महाराजांच्या कृपेने लोकांची त्या ढोंगी साधूपासून सुटका झाली.
आधार : HinduJagruti.org
संग्रह – श्री. सुधीर हेरेकर.
संपर्क क्रमांक : 9845837423
……………………………………………………………