पदवीनंतर प्रसारमाध्यम क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. पत्रकारितेत करिअर घडविण्यासाठी अस्खलित बोलणे जितके महत्वाचे तितकेच लेखन कौशल्यही महत्वाचे आहे, असे प्रतिपादन दै. पुढारीचे वृत्तसंपादक संजय सूर्यवंशी यांनी केले.
येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह महाविद्यालयात तिन्ही विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता आणि जाहिरात व्यवस्थापन यावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सूर्यवंशी बोलत होते. कॉलेजचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर, अर्थशास्त्र विभागप्रमुख व नॅक समन्वयक आर. एम. तेली, ग्रंथपाल श्रीमती कामुले, प्रा. डॉ. आरती जाधव, प्रा. डॉ. वृषाली कदम व्यासपीठावर होते.
सूर्यवंशी म्हणाले, माध्यमांचा मूळ उद्देश हा माहिती देणे, लोकशिक्षण व मनोरंजन हा असला तरी आजच्या सोशल मिडियाच्या युगात यामध्ये कालानुक्रमे बदल होत गेला आहे. या क्षेत्रात नव्याने येणार्यांना अनेक आव्हाने पेलावी लागणार असली, तरी संधीही तितक्याच उपलब्ध आहेत. मुद्रित माध्यम असो अथवा टीव्ही चॅनेल, दोन्हीकडेही अस्खलित बोलणे, दर्जेदार लिहिण्याची कला असावीच लागते. त्यांनी दैनिकाचे चालणारे प्रत्यक्ष काम, त्यामधील प्रमुख विभाग, बीटनिहाय पत्रकारिता कशी चालते, आकर्षक शिर्षकांचे महत्व याबाबतची संपादकीय माहिती देताना जाहिरात व वितरण विभागाचे काम कसे चालते, याबद्दलही थोडक्यात सांगितले.