जनतेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे एका गरीब दुर्बल घटकातील 6 वर्षाच्या बालकाच्या कॅन्सर उपचारासाठी मदत झाली असून तो मुलगा हळूहळू बरा होत आहे.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, गोकाक येथील 6 वर्षीय भर्माप्पा गौडा या बालकाला कॅन्सरने (ॲक्युट लिंफोब्लास्टिक लुकेमिया) ग्रासले होते. मात्र घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने त्याच्या उपचाराचा खर्च पालकांना परवडणारा नव्हता. भर्माप्पाचे वडील परागंदा असून त्याची आजी रोजंदारीवर कामाला जाते. या बालकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी उपचारासाठी अर्थसहाय्य केले आणि त्यामुळेच या बालकावर उपचार करणे शक्य झाले आहे. सध्या भर्माप्पा याच्यावर यशस्वी इंडक्शन केमोथेरपी करण्यात आली असून तो हळूहळू बरा होत आहे. या बालकाच्या उपचारासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेऊन मदत केली त्या सर्वांबद्दल भर्माप्पाच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.