मच्छे येथील शिवतेज युवा संघटना व श्री बाल शिवाजी वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमान एनएमएमएस स्पर्धा परीक्षा तयारीचे वर्ग सुरु करण्यात आले असून त्यांचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
एनएमएमएस स्पर्धा परीक्षा वर्गाचे उदघाटन प्रमुख पाहुणे वाचनालयाचे संस्थापक -अध्यक्ष अनंत लाड यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी उपस्थित विद्यार्थी -विद्यार्थिनींना बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये शिस्त, अभ्यासाचे नियोजन करावे व जास्तीत जास्त परीक्षेमध्ये गुण घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले. कान्सूली शाळेचे शिक्षक विनायक चौगुले व मच्छे शाळेचे शिक्षक देसाई सर यांनीही यावेळी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
एनएमएमएस स्पर्धा परीक्षा जास्तीत जास्त मुलांनी देऊन शिष्यवृत्ती प्राप्त करून घ्यावी यासाठी सुशांत चौगुले व संतोष जैनोजी अथक परिश्रम घेत आहेत. सदर स्पर्धा परीक्षेचे वर्ग यशस्वी करण्यासाठी शिवतेज युवा संघटना व श्री बालशिवाजी वाचनालयाचे कार्यकर्ते यांची मोलाची साथ लाभत आहे. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष गजानन छप्रे, उपाध्यक्ष प्रशांत नांदोडकर, मारुती बेळगांवकर, वासू लाड, अमित कणूकले, श्रीधर अनगोळकर, सुशांत चौगुले, बजरंग धामणेकर आदींसह बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विनायक चौगुले यांनी केले, तर गजानन छप्रे यांनी आभार मानले.