चालत बोलत विद्यापीठ हरपल
वारकरी सांप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं आज सकाळी निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. उद्या संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर नेरुळमध्ये अत्यंसंस्कार होणार आहेत.
बाबामहाराज सातारकर यांचं नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं होतं. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातार्यामध्ये झाला होता. बाबामहाराज सातारकरांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्तम मृदूंग वाजवायचे. बाबामहाराजांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांनाही संत वाङ्मयाची विशेष आवड होती.
किर्तनाची मोठी परंपरा
बाबामहाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी पदवीपर्यंतचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. वारकरी संप्रदायातील काही प्रमुख फडामध्ये बाबा महाराजच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. त्यांच्या कुळामध्ये १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. घराण्यातील गेल्या ३ पिढ्यांपासून असलेली कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा बाबामहाराजांनी पुढे सुरु ठेवली. बाबामहाराज सातारकर यांनी परमार्थाचे धडे गिरवण्यासाठी आपले चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांचे शिष्यत्व स्विकारले. वयाच्या ८ व्या वर्षांपासून बाबामहाराज सातारकर श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणू लागले . वयाच्या ११व्या वर्षांपासून बाबामहाराज सातारकर यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली.
१९५० ते १९५४ या कालावधीमध्ये बाबामहाराजांनी फर्निचरचा व्यवसाय केला . मात्र पुढे परमार्थामध्ये स्वत:ला वाहून घेण्याचा निश्चय करीत बाबामहाराजांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्ष परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबामहाराज यांची श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथामागे ४८ क्रमांकाची दिंडी होती . बाबा महाराज कीर्तन प्रवचनातून आपण आईच्या उदरात असल्यापासून वारी करतो असे सांगायचे . यावरून त्यांच्या घराण्याची वारीची परंपरा जुनी असल्याचे वाटते .
आप्पामहाराज सातारकर यांच्या देहावसानानंतर १९६२ सालापासून वारीची परंपरा बाबामहाराजांनी पुढे चालू ठेवली. समाजप्रबोधनचं कार्य म्हणून डिसेंबर १९८३ पासून दरवर्षी संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा बाबामहाराजांनी सुरू केली. आलंदी , पैठण, पंढरपूर, पिंपळनेर, भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे आदी ठिकाणी बबामहाराजांनी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले होते. कीर्तनानंतर ते भाविकांना विठ्ठलाचे वारकरी व्हा , माळकरी व्हा असा उपदेश करीत असत . त्यांनी महाराष्ट्रात सुमारे १५ लाखापेक्षा अधिक भाविकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी ‘श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था’ स्थापना केली. वारीच्या काळात या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सुमारे ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि औषधं पुरवली होती.
आषाढी वारीत रोजच्या मुक्कामी त्यांची कीर्तन , प्रवचनाची सेवा असे . पुणे , सासवड , लोणंद , फलटण येथे दोन मुक्काम असायचे त्यावेळी सकाळी व संध्याकाळी ते प्रवचन , कीर्तन करीत असत . हजारो भाविक त्यांच्या कीर्तनासाठी गर्दी करीत असत .
वारीच्या काळात वारीच्या बातम्या लिहीणाऱ्या पत्रकारांसाठी बाबा महाराज सातारकर म्हणजे हे एक चालत बोलत विद्यापीठ होते . पत्रकारांना एकादा अभंग सोडवायचा असेल तर लोणंद मुक्कामी पत्रकार खास करुन बाबा महाराजांची भेट घ्यायचे . अगदी साध्या सोप्या भाषेत ते अभंग समजावून सांगायचे .
वेळापूर येथे माझे सदगुरु श्री डॉ भाईनाथ महाराज कारखानीस यांच्या जयंतीच्या निमित्ताने बाबा महाराजांची कीर्तन सेवा आयोजित केली होती . त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांची निवासव्यवस्था अकलूजच्या शासकीय विश्रामगृहात केली होती व भोजन आमचे वेळापूरच्या घरी ठेवले होते . ते सायंकाळी ६ वाजता वेळापूरला आले . कीर्तन रात्री ९ वाजता होते . त्यामुळे कीर्तनापुर्वी विश्रांती व भोजनासाठी मी घरी आणले . त्यावेळी घर पाहून बाबा महाराज म्हणाले , हे कोणाचे घर आहे . मी म्हणालो आपले . अरे सुंदर आहे . त्यांनी घरावर कोरलेली संत तुकडोजी महाराजांची ” या झोपडीत माझ्या ” ही कविता वाचली आणि त्यांना खूप आनंद झाला . सूर्यकांत अकलूजचे कॅन्सल कर . मी कीर्तन झाल्यावर येथेच झोपतो असे ते म्हणाले . माईंसाठी मात्र अजून एक बेड टाक व चैतन्य महाराजांसाठी एक गादी टाक असे ते म्हणाले . त्यांनी गाडीतून सुवर्ण ज्ञानेश्वरीचा ग्रंथ काढायला सांगितला . आमच्या घरातून चौरंग घेवून त्यांनी त्यांना जी निवासासाठी रुम दिली होती तेथे सुवर्ण ज्ञानेश्वरीचे पूजन केले . कीर्तनापुर्वी महाराजांनी भोजन केले आणि कीर्तनाला निघून गेले . मी माईंसाठी रात्री नवीन कॉट , बेड आणला तर चैतन्य महाराजांसाठी गादी आणली . रुम स्वच्छ करुन घेतली . रात्री कीर्तन झाल्यावर महाराज वेळापूरला घरी मुक्कामी राहिले . सकाळी स्नानादी कर्मे करुन ते पुण्याला गेले . जाताना त्यांनी सूर्यकांत घर प्रसन्न आहे . खूप छान झोप झाली असे म्हटले . मला खूप आनंद झाला .
आज सकाळी बाबा महाराज यांचे निधन झाल्याची बातमी कळली . खूप दु:ख झाले . त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायाचे अतोनात नुकसान झाले आहे . संत साहित्याच एक चालत बोलत विद्यापीठ हरपले आहे .