मराठी पुस्तकांना जागतिक पुस्तक मेळ्यात चांगली मागणी
नवी दिल्ली, 16:देशविदेशातील साहित्य रसिकांसाठी दहा ते अठरा फेब्रुवारी या कालावधी दरम्यान साहित्य महाकुंभमेळ्याचा म्हणजेच जागतिक पुस्तक प्रदर्शनाचा आनंद लुटता येणार आहे. पुस्तकप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय असणारा नवी दिल्ली येथील ‘विश्व पुस्तक मेळा’ प्रगती मैदानावर भरण्यात आले आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) द्वारे आयोजित, या वर्षीचा पुस्तक मेळा ‘बहुभाषिक भारत: एक जिवंत परंपरा’ या संकल्पनेवर आधारित आहे. याअतंर्गत, सौदी अरेबियाला यावर्षीच्या प्रदर्शनातील पाहुण्या देशाचा मान (गेस्ट ऑफ ऑनर) देण्यात आले असल्याचे एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी माहिती दिली. सौदी अरब या देशाच्या सहभागाने, दोन राष्ट्रांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण, साहित्यिक प्रवचने आणि संवादांने नक्कीच चालना मिळेल, असे ही त्यांनी सांगतिले.
प्रगती मैदानावरील नवनिर्मित भारत मंडपमच्या परिसरात भरणाऱ्या या जागतिक पुस्तक प्रदर्शनात तळमजल्यावरील क्रमांक एक ते पाच या दालनांत होणाऱ्या यंदाच्या प्रदर्शनात, महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. येथे राजभाषा हिंदीसह इंग्रजी, मराठी आणि अन्य भाषांतील पुस्तके आहेत. याठिकाणी भारतीय विचार साधना फाऊंडेशन, ज्योत्स्ना प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन, माय मिरर प्रकाशन, ग्रंथ भवन पुणे, सरहद फाऊडेशन, पुणे बुक फेस्टिवलचा स्टॉल उभारण्यात आला आहे. या प्रकाशनाच्या दालनांमध्ये मराठीसह अन्य भाषांतील पुस्तके मांडण्यात आलेली आहेत. पुस्तकांमध्ये मराठी साहित्य, आध्यात्मिक, धार्मिक, वैचारिक आणि स्वयंविकासाची पुस्तके अधिक प्रमाणात खरेदी केली जात असल्याची माहिती प्रकाशकांनी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने (एनबीटी) होणारे यंदाचे 52 वे जागतिक पुस्तक प्रदर्शन प्रत्येक वयोगटातील ग्रंथप्रेमींसाठी वसुधैव कुटुंबकम या कल्पनेनुसार अनेक अर्थांनी खास आहे. या मेळाद्वारे बौद्धिक संवाद आणि वाचकवर्गाला चालना देण्याचा उत्तम व्यासपीठ प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया ग्रंथ भवन बुक स्टॉलचे संस्थापक, हेमंत देशमुख यांनी दिली. तसेच पुण्याचे विश्वकर्मा ग्लोबल एजुकेशन सर्व्हिसेस प्राइवेट लि. चे संस्थापक, उत्तम पाटील यांनी मेळ्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली.
यावेळी पुस्तक मेळ्यात युनायटेड किंगडम, फ्रान्स, तुर्की, इटली, रशिया, तैवान, इराण, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रिया,बांगलादेश, स्पेन, नेपाळ, श्रीलंका यासह इतर अनेक देश या पुस्तक मेळ्यात सहभागी झाले आहेत. पुस्तक महोत्सवासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे आणि वाव देणारे तसेच वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रमांचा समावेश आहे.
या प्रदर्शनात किमान 40 देश- विदेशातील 1500 हून जास्त प्रकाशक सहभागी झाले असून, 22 भारतीय तसेच परदेशी भाषांमध्येही पुस्तके उपलब्ध आहेत. प्रमुख संकल्पना, बालके,जागतिक दालने व आणि लेखक कट्टा याशिवाय प्रामुख्याने व्यावसायिक बैठकांसाठी प्रथमच एक वेगळे दालन उभारण्यात आले असून, याद्वारे भारतीय रसिकांना जगभरातील उत्तमोत्तम भव्यपुस्तक प्रदर्शनासह वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी वाचक वर्गाला मिळणार आहे. या महोत्सवाची सांगता 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.