ठिकठिकाणी घरफोड्या केलेल्या चौघा चोरट्यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केले आहे. त्यांच्याकडून 14 लाख 69 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेळगाव तालुक्यातील तारिहाळ, शिवाजी गल्ली येथील नागेंद्रस्वामी तिप्पण्णा कोळीकोप्प, वय 23, ज्योतिबा उर्फ अंजु उर्फ अजय अप्पय्या तिप्पायी, वय 27, तारिहाळ संभाजी गल्ली येथील महेश प्रकाश खणगावकर, वय 21 आणि रामपूर गल्लीतील रहिवासी मंजुनाथ अप्पय्या कोळेकर वय 21 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून विविध ठिकाणी घरफोड्या करून चोरलेला 14 लाख 69 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, गृहोपयोगी वस्तू आणि 3 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांच्या नेतृत्वाखालील तपासपथकाने ही कारवाई केली. चोरटयांनी हिरेबागेवाडी आणि मारिहाळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईबद्दल हिरेबागेवाडी पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.