No menu items!
Monday, December 23, 2024

श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणाऱ्या व्रताविषयीचे शास्त्र

Must read

 प्रस्तावना :  श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे.  श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर 1 सहस्र पटीने कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा प्रयत्न असतो.  श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणाऱ्या व्रताविषयीचे शास्त्र या लेखातून समजून घेऊया. श्री गणेश चतुर्थी निमित्त नवीन मूर्तीचे प्रयोजन, श्री गणेश चतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी आणि ही शास्त्रोक्त पद्धतीने ही मूर्ती घरी कशी आणावी ? श्री गणेश चतुर्थी या दिवशी चंद्रदर्शन करणे वर्ज्य असणे यांमागील कारण अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखात मिळतील. 

श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत : श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणारे व्रत हे सिद्धीविनायक व्रत या नावाने ओळखले जाते. वास्तविक हे व्रत सर्व कुटुंबांत होणे क्रमप्राप्त आहे. सर्व भाऊ एकत्र रहात असतील म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) आणि पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांत मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण ज्या वेळी द्रव्यकोश आणि पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशमूर्ती पुजावी. ज्या कुटुंबात एकच गणपति बसवण्याची दृढ परंपरा आहे, त्या कुटुंबात ज्या भावामध्ये देवाविषयी अधिक भाव आहे, त्याच्याच घरी गणपति बसवावा.

नवीन मूर्तीचे प्रयोजन : पूजेत गणपति असला, तरी गणपतीची नवीन मूर्ती आणावी. श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशलहरी पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. म्हणून गणेशलहरींचे आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती वापरतात आणि ती मूर्ती नंतर विसर्जित करतात.

श्री गणेश चतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी ? : चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी, तसेच पर्यावरणाला घातक आहे. मूर्तीची उंची अधिकाधिक एक फूट ते दीड फूट असावी. मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली, पाटावर बसलेली, डाव्या सोंडेची अन् नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. परंपरा किंवा आवड यांप्रमाणे गणेशमूर्ती आणण्यापेक्षा धर्मशास्त्रसंमत गणेशमूर्ती पुजावी.

शास्त्रोक्त विधी आणि रूढी यांचा अवधी : भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची सिद्धीविनायक या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य हा उत्सवप्रिय असल्याने एवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस श्री गणपति ठेवून त्याचा उत्सव करू लागला. बरेच जण (ज्येष्ठा) गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन करतात. एखाद्याच्या कुलाचारात गणपति पाच दिवस असेल आणि तो त्याला दीड किंवा सात दिवसांचा करावयाचा असला, तर तो तसे करू शकतो. यासाठी अधिकारी व्यक्तीस विचारण्याची जरूरी नाही. रूढीप्रमाणे पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, सहाव्या, सातव्या किंवा दहाव्या दिवशी श्री गणेशविसर्जन करावे.

मूर्तीची आसनावर स्थापना : पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची असते, त्यावर तांदूळ (धान्य) ठेवून त्यावर मूर्ती ठेवतात. आपापल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदुळाचा लहानसा ढीग करतात. मूर्तीत गणपतीचे आवाहन करून तिची पूजा केल्याने मूर्तीत शक्ती निर्माण होते. त्या शक्तीमुळे तांदूळ भारित होतात. सारख्या कंपनसंख्येच्या दोन तंबोर्‍याच्या दोन तारा असल्या, तर एकीतून नाद काढल्यास तसा नाद दुसर्‍या तारेतूनही येतो. त्याचप्रमाणे मूर्तीखालील तांदुळात शक्तीमुळे स्पंदने निर्माण झाली की, घरातील तांदुळाच्या साठ्यातही शक्तीची स्पंदने निर्माण होतात. अशा तर्‍हेने शक्तीने भारित झालेले तांदूळ वर्षभर प्रसाद म्हणून खाता येतात.

श्री गणेशचतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती घरी कशी आणावी ? : श्री गणेशचतुर्थीसाठी पुजावयाची मूर्ती शक्यतो आदल्या दिवशीच आणून ठेवावी. श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील कर्त्या पुुरुषाने इतरांसह जावे. मूर्ती हातात घेणार्‍याने हिंदू वेशभूषा करावी, म्हणजे अंगरखा (सदरा)-धोतर किंवा अंगरखा-पायजमा परिधान करावा. त्याने डोक्यावर टोपीही घालावी. मूर्ती आणतांना तिच्यावर रेशमी, सुती किंवा खादीचे स्वच्छ वस्त्र घालावे. मूर्ती घरी आणतांना मूर्तीचे मुख आणणार्‍याकडे आणि पाठ समोरच्या दिशेस असावी. मूर्तीच्या समोरच्या भागातून सगुण तत्त्व, तर पाठच्या भागातून निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत असते. मूर्ती हातात धरणारा हा पूजक असतो. तो सगुणातील कार्याचे प्रतीक आहे. मूर्तीचे मुख त्याच्याकडे केल्यामुळे त्याला सगुण तत्त्वाचा लाभ होतो, तर इतरांना निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो. श्री गणेशाचा जयजयकार आणि भावपूर्ण नामजप करत मूर्ती घरी आणावी. घराच्या उंबरठ्याबाहेर उभे रहावे. घरातील सुवासिनीने मूर्ती आणणार्‍याच्या पायांवर दूध आणि नंतर पाणी घालावे. घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मुख समोरील दिशेस करावे. यानंतर मूर्तीचे औक्षण करून ती घरात आणावी.

सजवलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती ठेवावी. सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवून सजावट लवकरात लवकर पूर्ण करावी. मूर्तीला मखरात बसवल्यानंतर मूर्ती हलणार नाही किंवा मूर्तीस काही अपाय होणार नाही, याची काळजी घ्यावी. मूर्तीवर एखादे वस्त्र किंवा रूमाल घालून ती झाकून ठेवावी. उंदराची मूर्ती वेगळी असल्यास तीही सुरक्षित ठेवावी. मूर्तीचे मुख पश्‍चिम दिशेला असेल अशा पद्धतीने ठेवावी, तसे शक्य नसल्यास पूजकाने पूजा करतांना स्वतःचे तोंड दक्षिण किंवा पश्‍चिम दिशेला येणार नाही, अशा पद्धतीने बसावे. मूर्तीचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल, तर पूजकाने मूर्तीच्या डाव्या हाताला काटकोनात बसावे, म्हणजे पूजकाचे मुख उत्तरेला किंवा पूर्वेला होईल. दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये. दक्षिणेकडे तोंड साधारणपणे उग्र देवतांचे असते, उदा. काली, हनुमान, नरसिंह इत्यादी. गणपतीची जी मूर्ती आपण आणतो, ती उग्र नसून प्रसन्न किंवा शांत असते; म्हणूनच शक्यतो तिला दक्षिणमुखी ठेवू नये.

मध्यपूजाविधी : गणपति घरी असेपर्यंत प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी प्राणप्रतिष्ठा सोडून गणपतीची नेहमी पूजा करतो तशी पूजा करावी आणि शेवटी आरत्या आणि मंत्रपुष्प म्हणावे. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर प्रतिदिन करावयाची पंचोपचार पूजा करावी.

उत्तरपूजा : गणपतीच्या विसर्जनापूर्वी ही पूजा करायची असते. विशिष्ट मंत्र म्हणून पुढे दिल्याप्रमाणे पूजा करावी – 1. आचमन, 2. संकल्प, 3. चंदनार्पण, 4. अक्षतार्पण, 5. पुष्पार्पण, 6. हरिद्रा (हळद)-कुंकूमार्पण, 7. दूर्वार्पण, 8. धूप-दीप दर्शन आणि 9. नैवेद्य. यानंतर आरती करून मंत्रपुष्पांजली समर्पावी. सर्वांनी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या आणि मूर्ती उजव्या हाताने हालवावी.

विसर्जन : उत्तरपूजेनंतर मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात. विसर्जनाला जातांना गणपतीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी आणि मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी.

श्री गणेश चतुर्थी या दिवशी चंद्रदर्शन करणे वर्ज्य असणे – श्री गणेश चतुर्थीला ‘कलंकित चतुर्थी’ असेही म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पहाणे वर्जित आहे. चुकूनही चतुर्थीचा चंद्र दिसल्यास ‘श्रीमद्भागवता’च्या 10 व्या स्कंधाच्या 56-57 व्या अध्यायात दिलेली ‘स्यमंतक मण्याची चोरी’ ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे. भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र पहावा. यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका रहात नाही. चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे. या मंत्राचा 21, 54 किंवा 108 वेळा जप करावा.

सिंहः प्रसेनमवधीत् सिंहो जाम्बवता हतः ।
सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमन्तकः ।। – ब्रह्मवैवर्त पुराण, अध्याय 78

अर्थ : हे सुंदर सुकुमार ! या मण्यासाठी सिंहाने प्रसेनला मारले आहे आणि जांबुवंताने त्या सिंहाचा संहार केला आहे; म्हणून तू रडू नकोस. आता या स्यमंतक मण्यावर तुझाच अधिकार आहे.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गणपति’

श्री आबासाहेब सावंत सनातन संस्था बेळगाव
(संपर्क क्रमांक – 7892400185)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!