मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यभरातून मंदिर विश्वस्तांची एकजूट !
मंदिरे ही हिंदू धर्माची शक्ती आणि भक्ती केंद्रे आहेत; मात्र आज अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने आधुनिक गझनी तेथील भूमी, संपत्ती, दागिने लुटत आहेत; पण दोषींवर ठोस कारवाई होतांना दिसत नाही. धार्मिक विधी-प्रथा परंपरांमध्ये अयोग्य पद्धतीने हस्तक्षेप आणि परिवर्तन केले जात आहे. अशा वेळी आपल्या या ‘प्राचीन भारतीय मंदिर संस्कृती’चे रक्षण होण्यासाठी सर्व मंदिरांचे प्रभावी संघटन व्हावे, मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाय काढणे, तसेच मंदिरांचे सुप्रबंधन व्हावे, या उद्देशाने ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित, मंदिरांशी संबंधित कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, लेखापरीक्षक आणि अधिवक्ते मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ’, पद्मालय, जळगाव यांच्या वतीने 4 आणि 5 फेब्रुवारी 2023 या दिवशी ‘श्री सुदर्शन मॉटेल्स, जळगाव’ येथे ही मंदिर परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या परिषदेला श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान, अष्टविनायक मंदिर ट्रस्ट, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू, श्री तुळजापूर देवस्थान पुजारी मंडळ, श्री मुंबादेवी मंदिर मुंबई, श्री रेणुकामाता मंदिर माहूर, श्री कानिफनाथ देवस्थान मढी, पुरोहित संघ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक, श्री गणपती मंदिर देवस्थान मंडळ पद्मालय जळगाव, श्रीराम मंदिर जळगाव, श्री मंगळग्रह सेवा संस्थान अमळनेर, सातपुडा निवासीनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, श्री भद्रा मारुती संस्थान संभाजीनगर, संत गुलाब बाबा देवस्थान अमरावती, श्री गणाचार्य मठ संस्थान मुखेड नांदेड, श्रीस्वामीनारायण मंदिर जळगाव, नवकार जैन टेम्पल ट्रस्ट, केरळीय क्षेत्र परिपालन समिती मुंबई, श्री व्यंकटेश कॉलेज देऊळगाव राजा ट्रस्टी संभाजीनगर आदी ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आणि काशी येथील ज्ञानवापी’साठी लढा देणारे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रसारक सदगुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, ‘सनातन संस्थे’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित रहाणार आहेत.
अयोध्येत श्रीराममंदिराचे भव्य निर्माण उत्साहात चालू आहे, ही हिंदूंसाठी आनंदाची बाब आहे; मात्र दुसरीकडे हिंदूंच्या अनेक मंदिरांवर होत असलेले आघात रोखणेही आवश्यक झाले आहे. यासाठी दोन दिवसीय मंदिर परिषदेमध्ये ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ आणि ‘काशी- मथुरा-भोजशाळा मुक्तीसंघर्ष’, ‘मंदिरांतील वस्त्रसंहिता’, ‘मंदिरांतील पूजाअर्जा : अडचणी आणि उपाय’, ‘मंदिरांतून धर्मशिक्षण आणि धर्मपालन यांचा प्रचार’, ‘मंदिरांच्या कायदेशीर अडचणी आणि उपाय’ आदी विषयांवर मान्यवरांचे उद्बोधन होणार असून या सर्व विषयांवर सांगोपांग चर्चा होऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या परिषदेत मंदिर संस्कृती रक्षणार्थ महत्त्वपूर्ण ठरावही संमत करण्यात येणार आहेत.
आपला नम्र,
श्री सुधीर हेरेकर
हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क : 9845837423 )