बेळगांव – महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगांव
आज मंगळवार दि. 29/10/2024 रोजी म. ए. युवा समितीची व्यापक बैठक युवा समिती कार्यालय, टिळकवाडी येथे आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी युवा समिती अध्यक्ष श्री अंकुश केसरकर हे होते.
1956 पासून बेळगावसह 856 गावे महाराष्ट्रापासून तोडून तत्कालीन केंद्र सरकारने तत्कालीन म्हैसूर प्रांतात घातली त्याचा निषेध म्हणून 1 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण सीमाभागात काळा दिवस म्हणून पाळला जातो, यावर्षी सुद्धा शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर हा दिवस मध्यवर्ती म. ए. समिती व शहर म. ए. समिती यांच्या आदेशानुसार गांभीर्याने पाळावा व मुकसायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच ऐन दिवाळी दिवशी काळा दिवस असल्याने त्या दिवशी सर्व मराठी भाषिकांनी आपले आकाश कंदील आणि विद्युत रोषणाई बंद ठेवून आपला निषेध नोंदवावा असे आवाहन आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले.
व्यापाऱ्यांवर कन्नडसक्ती करत दिवाळी निमित्त लावण्यात आलेले व्यापारी फलक हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महानगर पालिका प्रशासनाचा निषेध बैठकीत करण्यात आला.
तालुका स्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धेत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना कन्नड मध्ये बोलण्याची सक्ती करत त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आले त्याचा बैठकीत निषेध करण्यात आला आणि लवकरच जिल्हा शिक्षणाधिकारी याना भेटून याबाबत चर्चा करण्याचे ठरले.
कार्याध्यक्ष सचिन कळवेकर यांनी सोशल मीडियावर कार्यकर्त्यानी संयम बाळगून पोस्ट कराव्यात व आपला हा लढा सोशल मीडियावर जगभर पोहचविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
यावेळी उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, आश्र्वजित चौधरी, रोहन कुंडेकर, सुरज कुडूचकर, चिटणीस प्रतीक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, बापू भडांगे, अनिल वाडेकर, अजय सुतार, प्रतीक चौगुले, विकास भेकणे, आनंद पाटील, आशिष कोचेरी, प्रवीण धामणेकर , अक्षय बांबरकर, महेश जाधव, राकेश सावंत आदी उपस्थित होते, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले.