सर्वधर्म संमेलनासाठी स्वामी विवेकानंद भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो, अमेरिका येथे गेले होते. तेथे स्वामी विवेकानंद यांनी सर्व श्रोत्यांचे मन जिंकून ‘न भूतो न भविष्यती’ असा सर्वांवर प्रभाव पाडला होता. त्यामुळे सनातन हिंदू धर्माची श्रेष्ठता पाश्चात्यांना ज्ञात झाली. त्यावेळी स्वामी विवेकानंदांना अनेक संस्थांकडून व्याख्यानासाठी निमंत्रणे येऊ लागली. तिथे त्यांनी ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग यांसारखे अनेक विषय मांडले. सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन, वेळेचे भान विसरून स्वामीजींचे बोलणे ऐकत होते. लोकांमध्ये आणखी पुढचा विषय ऐकावा, अशी इच्छा उत्पन्न होत होती.
असाच एक कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यांनी स्वामी विवेकानंदांना तीव्र जिज्ञासेने प्रश्न विचारले. ‘‘हे महान सन्यासी, तुम्ही हे अलौकिक ज्ञान कोणत्या शाळेत अथवा विश्वविद्यालयात प्राप्त केले ? कृपया आम्हाला सविस्तर सांगावे.’’ त्यावर स्वामी विवेकानंद यांनी अवश्य सांगतो, असे म्हणून ते सांगू लागले. ‘‘मला हे ज्ञान माझ्या गुरूंकडून प्राप्त झाले.’’ त्यावर श्रोत्यांनी तुमचे गुरू कोण ? असे विचारले. त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले की तुम्हाला जाणून घ्यायची तीव्र जिज्ञासा असेल तर अवश्य सांगेन. त्याच दिवशी स्वामी विवेकानंदांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. प्रवचनाचे नाव होते ‘माझे गुरू’, त्यासाठी वर्तमानपत्रात प्रसिद्धी देण्यात आली होती.
त्यामुळे कुतुहलापोटी श्रोत्यांचा सागरच तिथे निर्माण झाला. प्रवचनाला प्रारंभ करण्यासाठी स्वामी विवेकानंद उठून व्यासपिठाकडे येत असताना अचानक शांतता निर्माण झाली. अथांग असा जनसागर पाहून स्वामी विवेकानंदांना सद्गुरूंविषयी कृतज्ञता दाटून आली. बोलायला प्रारंभ करण्या पूर्वी त्यांनी उच्चारलेले ‘माझे गुरुदेव’ हे शब्द अत्यंत भावावस्थेत उच्चारले गेले. त्यांनी भावपूर्ण उच्चार केल्याने त्यांच्या डोळ्यांसमोर साक्षात गुरूंचे रूप प्रकट झाले. त्यामुळे त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि रोमांचित होऊन कंपायमान झाले. त्यामुळे १० मि. ते काही बोललेच नाहीत. त्यांची ही अवस्था बघून श्रोते आश्चर्यचकित झाले. या पूर्वी शरीराला इजा झाल्यावर, पुष्कळ दुःखद प्रसंग घडल्यावर अथवा आई-वडील, नातेवाईक यांचा मृत्यू झाल्यावर डोळ्यात अश्रू येतात, हे लोकांनी पाहिले होते. या प्रसंगाच्या माध्यमातून सर्वांनाच गुरु कोण, त्यांचे महत्त्व काय, हे लक्षात आले.
गुरोर्र्माैेनं तु व्याख्यानं शिष्यस्तु छिन्नसंशयः ।