बेळगाव :
एम के पाटील
जिम काॅर्बेट ह्या जगप्रसिद्ध शिकाऱ्याचे नाव बऱ्याचवेळा ऐकून होतो. त्याच्या प्रसिद्ध मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ या पुस्तकाचे नाव अनेकवेळा वाचनात आले होते पण पुस्तक अद्याप हाती लागले नव्हते. मात्र पुस्तकाचे नाव माझ्या वाचायच्या यादीत अनेक दिवसापासून होते. लाॅकडाऊनच्या काळात कोणतेतरी पुस्तक घ्यायचे म्हणून शाळेच्या लायब्ररीमध्ये एखादे चांगले पुस्तक मिळेल म्हणून पुस्तकांच्या राशी ढुंडाळताना ‘जिम काॅर्बेट’ हे नाव एका पुस्तकाच्या कडेवर आढळल्याबरोबर लगेच ते पुस्तक राशीमधुन ओढुन हातात घेतले असता गेले काही दिवस ज्या पुस्तकाच्या शोधात होतो ते पुस्तक माझ्या हातात होते. कित्येक दिवसांपासून मनातील इच्छा पूर्ण झाली या आनंदात पुस्तक घेऊन घरी आलो.
जंगलप्रेमींसाठी मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ हे जिमकाॅर्बेट यांचे विश्वास भावे यांनी मराठीत अनुवादित केले पुस्तक म्हणजे आनंदाची पर्वणीच आहे. भारत हा वाघांसाठी चांगला अधिवास असणारा देश आहे. भारतातले घनदाट जंगल आणि विस्तिर्ण पसरलेले दऱ्याखोऱ्यांचे प्रदेश हे वाघांसाठी नंदनवनच आहेत. हिमालयातल्या गढवाल-कुमाऊँमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात नरभक्षक वाघांनी उच्छाद मांडला होता. यातील काही वाघांनी तर शेकडोंच्यावर माणसे मारली होती. तेथील स्थानिकांचे जगणं मुश्किल झाले होते. शासनाच्या आदेशाने कायदेशीर परवानगी घेऊन जिम काॅर्बेट यांनी या वाघाना यमसदनी धाडण्यासाठी जी मोहीम उघडली ती या पुस्तकातील प्रकरणांमध्ये क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवते. पुस्तक वाचताना आपल्याला कुमाऊंच्या जंगलात जिम काॅर्बेटच्या प्रत्यक्ष सोबतीची अनुभूती मिळते. मुळात वाघ नरभक्षक बनण्यामागे वाघ जायबंदी होणे आणि क्वचित म्हातारपणामुळे हतबल होणे ही कारणे असतात. मनुष्य हे काही वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघांना होणाऱ्या या जखमा एक तर शिकाऱ्याच्या बंदुकीच्या गोळीमुळे अथवा साळिंदराची शिकार करताना वाघाचा संयम सुटल्यामुळे होतात. साळिंदराच्या सुया वाघाच्या शरीरात रुतून बसतात, त्या त्याला काढणे अशक्य होते आणि मग तो जायबंदी होतो. मग एकदा का त्याला माणसाच्या मांसाची चटक लागली ही तो मग सराईत बनतो आणि एकामागोमाग एक माणसांच्या नरडीचे घोट घेत सुटतो. अशा डझनभर नरभक्षक वाघांची शिकार करतानाचे जिम काॅर्बेट यांचे अनुभव रोमांचकारी आणि मनात धडकी भरवणारे आहेत. त्यांच निसर्गाच निरिक्षण अफाट आहे. संपूर्ण आयुष्य जंगलात घालवलेल्या या निष्णात शिकाऱ्याचे जंगलातल्या हालचाली आणि घडलेल्या घटनांचे सुसंगत चित्र उभे करण्याचे तंत्र कमालीचे आहे. जंगलात घडलेल्या प्रत्येक हालचालींची सुसंगत मांडणी करुन नरभक्षक वाघांचा माग काढण्याची त्यांची पद्धत अदभुत होती. वाघाबरोबरच जंगलातील इतर प्राणी आणि पक्षांच्या सवयी आणि सभोवताली वाघांचे अस्तित्व दर्शवणारे त्या प्राण्यांचे आवाज ओळखण्याचे या शिकाऱ्याचे कसब अचुक होते. म्हणून तर डझनभर वाघांचे ते कर्दनकाळ बनले. त्यांच्या म्हणण्यानुसार वाघ नरभक्षक बनतो त्यावेळी त्याला पकडणे अशक्यप्राय झाल्यास त्याला संपवणे हेच योग्य ठरते. यातील काही नरभक्षक वाघांना या शिकाऱ्यांने काॅल देऊन म्हणजेच स्वतःच्या तोंडून डरकाळ्या निर्माण करुन जवळ बोलावून संपवले आहे. विविध प्राण्यांच्या अलार्म काॅल्सचे त्यांचे अनुमान सहसा चुकत नसे. वाघांना काॅल देऊन बोलावणे म्हणजे सादप्रतिसादातुन त्यांना टप्यात आणून त्यांच्यावर किलींग शाॅट साधण्याचे जिम काॅर्बेटचे कसब कोणालाच जमले नसेल.
वाघांच्या शिकारीबरोबरच त्यांचे निसर्गाबद्दलचे आणि वाघांबद्दलचे प्रेमही लपून राहत नाही. त्यांच्या पक्षीनिरीक्षणाचीही प्रचिती क्षणाक्षणाला येते. कथा वाचताना डोंगररांगात आपण जिम काॅर्बेटसोबत चालत असल्याचा अनुभव येतो. वाघांबाबतची शास्त्रीय माहिती आणि वाघांबद्दलचे चुकीचे समज याविषयी प्रत्येक पायवाटेने जाताना ते माहिती देतात.
पूर्वी शिकारीला बंदी नव्हती. स्वातंत्र्यपूर्व काळात शिकार पथके म्हणजेच शिकारसंघ अस्तित्वात होते. शिकरीसाठी कँप सरकार घेत असे. हिंस्त्र प्राण्यांची शिकार केल्यास बक्षीस दिले जायचे. नरभक्षक वाघांची शिकार केल्यास ट्राॅफी दिली जायची. शिकारीसाठी ‘शुटींग पास’ दिले जायचे. अशा शिकारीला कायदेशीर मान्यता दिली जायची. आत्ता वाघांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने आणि चोरट्या शिकारींमुळे भारतातली वाघांची संख्या कमी झाली. स्वातंत्र्यानंतर अनेक कायदे झाले आणि शिकारीवर बंदी आली. अनेक कडक कायदे झाल्याने जंगले वाढली आणि वाघांसाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास चांगला निर्माण झाल्याने वाघांची संख्याही वाढते आहे हे आश्वासक आहे. वाघासारखे सुंदर आणि उमदे जनावर जगले पाहिजे. त्यांची संख्या अजून वाढली पाहिजे. एखाद्या वाघ चुकून नरभक्षक झालाच तर सरकार आजही त्याला ठार करण्याचे आदेश देते. ज्यांना जंगलाविषयी, निसर्गाविषयी आवड आहे त्यांनी जरुर मॅनइटर्स ऑफकुमाऊँ या पुस्तकाच्या माध्यमातून जंगलात जिम काॅर्बेटसोबत भटकंतीचा थरारक अनुभव घ्यावा.