मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील
नवी दिल्ली, 25 : हवामान बदलामुळे अवेळी येणारा पाऊस, चक्रीवादळ, दुष्काळ अशावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज असने ही काळाची गरज असून ही यंत्रणा अधिक बळकट करणे ही राज्याची प्राथमिकता आहे. आज यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विभाग प्रमुख आणि सदस्य यांची भेट घेतली असल्याची माहिती बैठकीनंतर राज्याचे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली .
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विभाग प्रमुख तसेच सदस्य कमल किशोर, सदस्य राजेंद्र सिंग, क्रिष्णा एस. वत्स यांची त्यांच्या कार्यालयात मंत्री श्री पाटील यांनी भेट घेतली.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यातील प्रशासकीय विभागात होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनात स्थानिक युवकांचा प्रामुख्याने समावेश असावा यासाठी राज्य योजना आखत आहे. यामध्ये तात्काळ देण्यात येणाऱ्या मदतीसाठी त्यांना अद्यावत साधने (किट) उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी श्री. पाटील यांनी केली.
आपत्ती येऊ शकणाऱ्या जिल्ह्यांची माहिती राज्याने केंद्र शासनाला दिली असल्याचे प्राधिकरणाच्या सदस्यांनी सांगितले याअतंर्गत येणाऱ्या काळात एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईड, नेहरू युवा केंद्राच्या विद्यार्थ्यांना येत्या काळात प्रशिक्षित केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. याचे मॉकड्रील प्रशिक्षण वांरवार सबंधित यंत्रणेकडून दिले जावे अशी अपेक्षा यावेळी प्राधिकरणाच्या सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली.
प्रत्येक कुंटूबातील किमान एका व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. राज्यात सध्या 20 जिल्ह्यांमध्ये 7900 ‘आपदा मित्र’ आहेत. 76 स्थायी निवारण केंद्र आहेत. हे तीन माळयाचे असून प्रथम माळा स्त्रीयांसाठी, दुसरा वृद्धांसाठी आणि तिसरा माळा युवकांसाठी असतो. साधरणत: जून ते ऑगस्टच्या काळात हे केंद्र रिकामे केले जाते. अन्यथा स्थानिक लोक या केंद्रांमध्ये विविध उपक्रम राबवितात यातून केंद्रामध्ये स्वच्छता ही होते, अशी माहिती दिली. याशिवाय राज्यात लहान-लहान निवारण केंद्र राज्य सरकार आवश्यकते नुसार उभारू शकतात असे ही या सदस्यांद्वारे सांगण्यात आले.
येत्या काळात राज्यातील आपदा मित्रांना आपत्तीच्या काळात वापरण्यात येणारी सुसज्ज किट देण्यात येईल, अशी माहिती श्री पाटील यांनी यावेळी दिली.