बसमधील खिडकीजवळील सीटसाठी झालेल्या वादातून दोन गटांमध्ये मारामारी झाली असून, यामध्ये एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना आज बुधवारी सकाळी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात घडली. मांज सनदी राहणार पंत बाळेकुंद्री ता. बेळगाव हा विद्यार्थी चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
बसमधील खिडकी सीटवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. वाद चिघळून हाणामारी झाली आणि काही अज्ञात तरुणांनी या विद्यार्थावर चाकूने हल्ला करून तेथून पलायन केले.
गंभीर जखमी अवस्थेत सनदी याला तात्काळ जिल्हा रुग्णालयाच्या दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच डीसीपी रोहन जगदीश यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. या घटनेचा तपास मार्केट पोलीस ठाणे करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात भरदिवसा बसस्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.