शिक्षण विभागाकडून लवकरच शिक्षक भरती होणार असून सहावी ते आठवीपर्यंतच्या शिक्षक भरतीची अधिसूचना सोमवारी लागू होणार आहे. जिल्हानिहाय शिक्षकांची गरज लक्षात घेऊन पदांचे वाटप करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीतही मराठी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य द्यायला हवे. अशी मागणी खानापूर म ए युवा समितीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे .
बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांसह इतर ठिकाणच्या मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता आहे. त्यामुळे कन्नड बरोबरच मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही शिक्षक भरती व्हायला हवी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे .
बेळगाव जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या तीन हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. यामध्ये बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. सध्या या दोन तालुक्यातील अनेक शाळा अतिथी शिक्षकांवर अवलंबून आहेत. दरम्यान, मराठी शाळांना प्राधान्याने शिक्षक भरती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे .जर या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्यात आला नाही तर कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .