No menu items!
Saturday, March 15, 2025

चातुर्मास्य (चातुर्मास) महात्म

Must read

पृथ्वीवरील रज-तम वाढल्याने या कालावधीत सात्त्विकता वाढवण्यासाठी चातुर्मासात व्रतस्थ राहावे, असे शास्त्र सांगते. चातुर्मासाचे महत्त्व, चातुर्मासातील वर्ज्य-अवर्ज्य गोष्टी कोणत्या याविषयीची माहिती.   

‘आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणार्‍या चार मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात.

मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. ‘जसजसे एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जावे, तसतसे काळाचे परिमाण पालटते’, हे आता अंतरिक्षयात्री चंद्रावर जाऊन आले, तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवावरून सिद्धही झाले आहे. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस ‘शयनी एकादशी’ म्हटले आहे; कारण ‘त्या दिवशी देव झोपी जातात’, अशी समजूत आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी’ असे म्हणतात. वस्तूतः दक्षिणायन सहा मासांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी; पण बोधिनी एकादशीपर्यंत चारच मास पुरे होतात. याचा अर्थ असा की, एक तृतीयांश रात्र शिल्लक आहे, तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात.’ ‘नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असतांना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, असे समजतात. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’

देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते असे चातुर्मासाचे महत्व आहे .

अ. ‘या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते.

आ. पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला.

इ. मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.

ई. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.

उ. चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात.’

ऊ. चातुर्मासात सण आणि व्रते अधिक प्रमाणात असण्याचे कारण : श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या चार मासांत (चातुर्मासात) पृथ्वीवर येणार्‍या लहरींत तमोगुण अधिक असलेल्या यमलहरींचे प्रमाण अधिक असते. त्यांना तोंड देता यावे; म्हणून सात्त्विकता वाढवणे आवश्यक असते. सण आणि व्रते यांद्वारे सात्त्विकता वाढत असल्याने चातुर्मासात जास्तीतजास्त सण आणि व्रते आहेत. शिकागो मेडिकल स्कूलचे स्त्रीरोगतज्ञ प्रोफेसर डॉ. डब्ल्यु. एस्. कोगर यांनी केलेल्या संशोधनात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार मासांत विशेष करून भारतामध्ये, स्त्रियांना गर्भाशयासंबंधी रोग चालू होतात किंवा वाढतात, असे आढळले.

ए. चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.

   ‘सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसर्‍या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.’

चातुर्मासात काय वर्ज्य करावे

  1. ‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळूंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़ वर्ज्य करावे .
  2. मंचकावर शयन (झोपू ) नये.
  3. ऋतूकालावाचून स्त्रीगमन
  4. परान्न घेऊ नये
  5. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य
  6. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधुत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे.

आ. चातुर्मासात काय अवर्ज्य करावे

चातुर्मास्यात हविष्यान्न सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, समुद्रातले मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत. (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

संकलक : आबासाहेब सावंत

क्रमांक : 07892400185

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!