गोव्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. विविध राष्ट्रीय पक्षांचे नेते आपापल्या पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी गोव्यात धावत आहेत. मात्र गोव्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रचारासाठी बेळगावातील सामाजिक कार्यकर्ता धावून जाण्याची घटना घडली असून त्याची एक वेगळी चर्चा सुरू आहे.
बेळगावचे माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे हे गोव्यातील प्रीयोळ मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप निगळे यांच्या प्रचारासाठी गोव्यात गेले आहेत .आज संदीप निगळे यांच्या निवडणूक जाहीरनाम्याचे उद्घाटन विजय मोरे यांच्या हस्ते झाले.
बेळगाव शहर आणि परिसरातील तसेच जिल्ह्यातील अनेक नागरिक या प्रीयोळ मतदारसंघात राहतात या मतदारसंघात विजय मोरे यांनी संदीप निगळे यांचा प्रचार केला.
संदीप निगळे हे भाजप कार्यकारिणीचे सदस्य असूनही त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणुकीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत सहभागी झालेले निगळे एक चांगले उद्योजक असले तरी सामाजिक कार्यकर्त्याचा त्यांचा पिंड आहे. गोव्यातील विशेषता प्रीयोळ भागातील आपल्या नागरिकांना बेळगाव येथे उपचार मिळवून देण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करत असतात. या उपचाराच्या निमित्ताने बेळगावचे माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांचा आणि त्यांचा मित्र संबंध आहे. बेळगावच्या के एल ई इस्पितळात गोव्यातील असंख्य निराधार आणि गरजू रुग्णांना उपचार देण्यात संदीप निगळे यांनी विजय मोरे यांची मदत यापूर्वी घेतलेली आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आपल्या मित्राच्या प्रचारासाठी आता विजय मोरे गोवा येथे गेले आहेत.