No menu items!
Wednesday, February 5, 2025

पंतप्रधान यांची महाराष्ट्राला गुरुवारी भेट 

Must read

शिर्डी दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन 

86 लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांना लाभ देणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ पंतप्रधानांच्या हस्ते सुरू

नवी दिल्ली, 25 : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राच्या दौ-यावर असणार आहेत.  या दौऱ्यादरम्यान ते 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन तसेच 86 लाखांहुन अधिक शेतकऱ्यांना  ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ  देतील व निळवंडे धरणाचे जलपूजन करुन कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील. 

 पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान दुपारी एकच्या सुमारास, पंतप्रधान अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पोहोचतील. श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा आणि दर्शन करुन,  मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही ते करणार आहेत. दुपारी  दोन वाजता, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि धरणाच्या कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. तद्नंतर 3.15 च्या सुमारास, श्री मोदी शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायु यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. 

शिर्डी येथील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन

शिर्डी संस्थान येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त  नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या नवीन इमारतीत विविध सुविधांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह अनेक वेटिंग हॉल, क्लोक रूम, स्वच्छतागृहे, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे . 

निळवंडे धरणाचे जलपूजन व डाव्या काठाचे कालव्याचे जाळे देशाला करतील समर्पित 

शिर्डी संस्थानचे दर्शन घेउुन पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या काठाचे (८५ किमी) कालव्याचे जाळे राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे पाण्याचे पाइप वितरण जाळे सुकर होईल व सात तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) 182 गावांना याचा लाभ होईल. या धरणासाठी सुमारे 5177 कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जात आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ चा शुभारंभ- 86 लाख शेतक-यांना मिळणार लाभ

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ चा पंतप्रधान श्री मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार. या योजनेचा महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ होईल.

पंतप्रधान श्री मोदी यांच्या व्यस्त दौ-यात ते अहमदनगर शासकीय रूग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी); जळगाव ते भुसावळ जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी); NH-166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा आदि प्रकल्पांचे उद्घाटन तसेच माता व बाल आरोग्य शाखेची पायाभरणी, आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप करतील.

गोवा येथे सायंकाळी 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन

            महाराष्ट्राच्या दौरा संपन्न झाल्यानंतर श्री मोदी गोवा राज्याला भेट देतील. राज्यात पहिल्यांदाच होणा-या 37व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील. मड़गाव येथे होणा-या या खेळांमध्ये देशभरातील 10000 पेक्षा अधिक खेळाडू  28 ठिकाणी 43हून अधिका क्रीडाशाखांमध्ये सहभागी होणार आहेत.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!