विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने १२ बेरोजगारांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल ९ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातला आहे याप्रकरणी सीईएन पोलीस स्थानकात अराफत महम्मद अन्सार (वय २२) रा. अझमनगर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी शालू शर्मा रा. गोविंदपुरी-दिल्ली आणि साजिद अली रा. गोविंदपुरी-दिल्ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अराफत याने २६ जून २०२५ रोजी दुपारी १२ च्या दरम्यान आरिया इंटरनॅशनल नावाने इन्स्टाग्रामवर परदेशात मुलांना पाठवून नोकरी मिळवून देतो, अशी जाहिरात पाहिली. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क झाल्यानंतर व्हॉट्सअॅप नंबरवरून विचारणा केली असता समोरील व्यक्तीने आपले नाव शालू शर्मा व साजिद अली असल्याचे सांगितले
गोविंदपुरी येथे ऑफिस असल्याचे सांगून परदेशात जाणाऱ्या मुलांसाठी
व्हिसा देऊन विदेशात नोकरी देतो, असे सांगून व्हॉट्सअॅपवर आरिया इंटरनॅशनल एचआर प्रायव्हेट लिमिटेड हा मेसेज पाठविला. मिनिस्ट्री ऑफ कॉपॅरिट अफेअर्सवर जाऊन चेक करण्यास सांगितले. फिर्यादीने पाहणी केली असता ती बरोबर असल्याचे दिसून आले.
त्यामुळे १२ बेरोजगारांना इराक व इतर देशांमध्ये नोकरीसाठी पाठवितो, असे सांगून भामट्यांनी १७ जुलै २०२५ ते १४ ऑगस्ट २०२५ च्या काळात गुगल पे, फोन पे, इंटरनेट बैंकिंग, जन स्मॉल फायनान्स, बंधन बैंक, एस बैंक, एसबीआय, डीबीएस बैंक आणि यूपीआय नंबरच्या माध्यमातून टप्याटप्याने ९ लाख ८० हजार रुपयांची रक्कम १२ जणांकडून वसूल केली आहे.
मात्र पैसे भरूनदेखील परदेशात नोकरी न मिळाल्याने फशी पडलेल्यांनी गुन्हेगारांविरोधात सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. ८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पोलीस निरीक्षक बी. आर. गड्ढेकर तपास करीत आहेत



