No menu items!
Friday, March 14, 2025

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा

Must read

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा अपूर्व उत्साहात मराठा मंदिर येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री आकाश शंकर चौगुले आय आर एस जी एस टी अधिकारी बेळगाव हे उपस्थित होते त्यांनी मातृभाषेतून शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन श्री आकाश चौगुले आणि मराठा मंदिरचे चेअरमन आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते तर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर आणि खानापूर समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आकाश चौगुले म्हणाले इंग्रजांनी आपल्या इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढविण्यासाठी आणि इंग्रजी रुजवण्यासाठी पद्धतशीर योजना आखली,आणि ती इंग्रजी आपल्यावर थोपवली. त्या इंग्रजीचे ओझे आपण आजही वहात आहोत. प्रत्येकानी कोणताही न्यूनगंड न बाळगता आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी मातृभाषेचा पर्याय निवडला पाहिजे कारण त्या भाषेत आपल्याला व्यक्त होणे सोपे असते आणि आपली प्रगतीही मातृभाषेतून योग्य रित्या होऊ शकते असे त्यांनी सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअरच्या संधी याविषयी बोलताना ते म्हणले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले त्यामध्ये प्रत्येक गड किल्ल्यावर आपल्या मर्जीतला आणि हुशार कारभारी नेमला आणि त्या माध्यमातून राज्यकारभार चालवून सुशासन निर्माण केले. म्हणजेच स्वराज्य निर्माण केले. तसेच आज २१व्या शतकात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन उच्च पदस्थ झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने उच्च अधिकारी म्हणून विराजमान होऊन कारभार चालवला पाहिजे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनी भविष्यात स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने पहावे आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हावे असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणामध्ये श्री अंकुश केसरकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला आणि युवा समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ चे बक्षीस वितरण, कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा, २०२४ साली दहावीमध्ये अव्वल क्रमांक मिळवलेल्या बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. व्यासपीठावर समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, मदन बामणे, ॲड .सुधीर चव्हाण, महादेव चौगुले, सचिन हंगिरगेकर ,विलास बेळगावकर, नगरसेवक रवी साळुंखे, तुकेश पाटील, निपाणी तालुका समितीचे कार्याध्यक्ष बंडा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभियंता सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित देसाई, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, शिवानी पाटील, माजी नगरसेवक पंढरी परब,समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, राजू बिरजे, शिवाजी कुडूचकर, किरण हुद्दार, निपाणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अमोल शेळके, युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, सुरज कुडूचकर, महांतेश अलगोंडी, हिंडलगा ग्रामपंचायतचे सदस्य डी. बी. पाटील, रमेश रायजादे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी केले तर सूत्रसंचालन साक्षी गोरल आणि प्रतीक पाटील यांनी केले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!