शांताई वृद्धाश्रमाच्या तर्फे बांधण्यात आलेल्या नव्या मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन झाले. माहेश्वरी अंध शाळेचे सचिव प्रभाकर नागरमुनोळी यांच्या हस्ते मेडीटेशन हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शांताई पाटील, विजय पाटील आणि पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते.
विशाल इन्फ्राबिल्ड चे मालक आणि शांताई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शांताई वृद्धाश्रमात वास्तव्यास असणारे आजी-आजोबा तसेच परिसरातील वेग वेगळ्या कारखान्यातील कामगारांसाठी आत्मशांती मिळवण्याच्या दृष्टीने हे मेडीटेशन उभारणीचे उद्दिष्ट असून या साठीच या मेडिटेशन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे.
त्यामध्ये एक बुद्धाची प्रतिमा ठेवण्यात आली असून त्या माध्यमातून ध्यान करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती यावेळी कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी दिली.
तसेच विजय पाटील यांचा 53 वा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. व्यासपीठावर विजय पाटील यांच्या आई शांताई , पत्नी विजया पाटील, बहीण नंदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शांताई परिवारात सेवा देणाऱ्या विविध सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबरीने सोमवारी दुपारी चार वाजता मुंबई येथील डॉक्टर संतोष बोराडे यांचा जीवन संगीत कार्यक्रम शांताई वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आला असून सर्वांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.