No menu items!
Thursday, November 21, 2024

चंद्रावरून झळकली ‘चंद्रमुखी’
सुमारे ३० फूटाच्या फोटोचे अनावरण

Must read

प्रवेश करताच रोषणाईने झगमगलेले भव्य मैदान... सर्वत्र रंगीबेरंगी पताके... बाजूला तिकीटबारी... समोरच ३५ फुटाचा 'त्या' लावण्यवतीचा फोटो... समोर सजलेला तमाशाचा फड... गजरा आणि अत्तराचा दरवळणारा सुवास... फेटा बांधलेला रसिक समुदाय... तोंडात विडा... ढोलकीचा ताल... घुंगरांची साथ... बहारदार लावणी... रसिकांच्या टाळ्या, शिट्ट्यांचा गजर... हे वर्णन ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तमाशाचा हा फड महाराष्ट्रात कुठे रंगला आहे. तर हा धमाकेदार भव्य फड रंगला होता मुंबईतील ऑपेरा हाऊस येथे. जिथे प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांचे कार्यक्रम होतात. तिथे प्रथमच आज ढोलकीची थाप आणि घुंगरांचा नाद घुमत होता. निमित्त होते 'चंद्रमुखी'चे. अनेक दिवसांपासून ज्या 'चंद्रमुखी'ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते ती 'चंद्रमुखी' म्हणजेच सौंदर्याची खाण असलेली चंद्रा. या 'चंद्रा'वरील पडदा अखेर उठला असून स्वर्गलोकातील एखाद्या अप्सरेप्रमाणेच चंद्रावरून तिचे दिमाखदार आगमन झाले. ही सौंदर्यवती चंद्रा म्हणजे अमृता खानविलकर. या वेळी अमृतावर चित्रित करण्यात आलेले 'चंद्रा' हे शीर्षक गीतही सादर करण्यात आले. या गाण्याला श्रेया घोषाल हिने स्वरबध्द केले असून गाण्याचे बोल गुरू ठाकूर यांचे आहेत. तर या गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे. डोळे दिपवून टाकणाऱ्या या भव्य सोहळ्यात ३५ फुटाच्या 'चंद्रा'च्या फोटोचे अनावरण लाल दिवाच्या गाडीमधून आलेल्या रूबाबदार अशा दौलत देशमाने म्हणजेच आदिनाथ कोठारे याने केले. या वेळी चंद्राने आपल्या बहारदार लावणीने उपस्थितांची मने जिंकली. 

या सोहळ्यात खऱ्या लावणी कलावंतांनाही आपली लावणी सादर केली. यात गण, गवळण, असे लावणीचे विविध प्रकार होते. या वेळी या लोककलावंतांना चित्रपटाच्या टीमतर्फे सन्मानितही करण्यात आले. या कार्यक्रमात खरी रंगत आणली ती आबूराव -बाबूराव म्हणजेच पुष्कर श्रोत्री आणि संदीप पाठक यांनी आपल्या अनोख्या अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन केले. काही दिवसांपूर्वीच ‘चंद्रमुखी’चे टिझर प्रदर्शित झाले होते. त्यावेळी ही पाठमोरी बसून शृंगार करणारी ‘चंद्रमुखी’ दिसत होती. तर पिळदार शरीरयष्टी असलेला करारी दौलत देशमाने ही पाठमोरा दिसत होता. नुकताच दौलत देशमानेचा चेहरा आपल्या समोर आला आणि आता ‘चंद्रा’ ही प्रेक्षकांसमोर आली आहे. राजकारणात मुरलेला दौलत देशमाने आणि लावणी कलावंत यांच्या अनोख्या प्रेमाची ही कहाणी आहे.

आपल्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकर म्हणते, ” आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा सर्वात वेगळी आणि ताकदीची भूमिका मी ‘चंद्रमुखी’मध्ये साकारत आहे. चंद्रा ही एक लावणी कलावंत असून लावणी कलावंतांचे जीवन ती प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मला खूप आनंद आहे की, अशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आहे. अनेक दिवसांपासूनच्या ‘चंद्रमुखी’च्या उत्सुकतेला आज पूर्णविराम मिळाला आहे. जी उत्सुकता तुम्हाला होती, तशीच उत्सुकता आता मला चित्रपट झळकण्याची आहे. हा चित्रपट आम्ही या लोककलावंताना समर्पित करत आहोत. या निमित्ताने त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न असून या भव्य चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच घ्यावा.’’

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ” ‘चंद्रमुखी’चा चेहरा प्रेक्षकांसमोर कधी येणार, याची आम्ही सुद्धा आतुरतेने वाट पाहात होतो. मात्र यासाठी आम्ही योग्य वेळेच्या शोधात होतो आणि अखेर ती योग्य वेळ आली आहे. चंद्रा ही अशी लावण्यवती आहे, जिच्या सौंदर्याने कोणीही घायाळ होईल. आपल्या सौंदर्याने, अदांनी समोरच्याला मोहात पडणारी ‘चंद्रा’ लढवय्यी आहे. तिच्या या लढ्याला यश मिळते का, हे ‘चंद्रमुखी’ पाहिल्यावरच कळेल.” तर संगीतकार अजय -अतुल म्हणतात, ” हा एक भव्य चित्रपटअसल्याने त्याच्या गाण्यांची भव्यताही तितक्याच ताकदीची हवी होती. चंद्रासारख्या सौंदर्यवतीला साजेशी अशी गाणी या चित्रपटात आवश्यक असल्याने यासाठी आम्ही बरीच मेहनत घेतली. यात आम्हाला दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्यासह चित्रपटाच्या टीमची बरीच मदत झाली. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. त्यामुळे आमच्या या गाण्यांना अमृताने तिच्या नृत्याच्या अदाकारीने चारचाँद लावले आहेत.”

तर ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”इतक्या महिन्यांपासून प्रेक्षकांनी जी उत्सुकता ताणून ठेवली होती, त्या ‘चंद्रमुखी’चा चेहरा अतिशय थाटात प्रेक्षकांसमोर आला आहे. हा एक भव्यदिव्य चित्रपट असून राजकारणाभोवती फिरणारी एक आगळीवेगळी प्रेमकहाणी यात पाहायला मिळणार आहे. हा सोहळा ब्रिटिश कालीन ऑपेरा हाऊसमध्ये करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे आणि लावणी ही आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. त्यामुळे जिथे इंग्रजी आणि हिंदी भाषांना प्रतिष्ठेचे स्थान दिले जाते, तिथे आपली अभिजात परंपरा सादर व्हावी, हा आमचा अट्टाहास होता. या निमित्ताने या लोककलावंतांना एक व्यासपीठही मिळाले.” तर गोल्डन रेशो फिल्म्सचे सीओओ पियुष सिंग म्हणतात, ”चंद्रमुखी’ आम्हाला कोणत्याही माध्यमात प्रदर्शित न करता तो चित्रपटगृहातच प्रदर्शित करायचा होता. म्हणूनच आम्ही इतकी प्रतीक्षा केली. आता शंभर टक्के आसनक्षमतेला परवानगी असल्याने या चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांनी सिनेमागृहातच घ्यावा. चित्रपटाची टीम आणि अजय -अतुलची अफलातून गाणी या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने एक उत्तम योग जुळून आला आहे.”

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीवर आधारित, अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. ‘नटरंग’नंतर बऱ्याच काळानंतर अजय -अतुल यांचे दमदार संगीत प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली असून ‘चंद्रमुखी’ येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!