ताजिकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या 11 व्या आशियाई वरिष्ठ कुराश अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावच्या मलप्रभा जाधव हिने यश मिळवित कांस्य पदक हस्तगत केले आहे.
दुशनबे ताजिकिस्तान येथे गेल्या 17 ते 21 मार्च या कालावधीत 11 व्या आशियाई वरिष्ठ कुराश अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी 20 देशांचा सहभाग होता.
या स्पर्धेत 48 किलो मुलींच्या वजनी गटात बेळगावच्या मलप्रभा जाधव हिने चमकदार कामगिरी केली आहे. मलप्रभा हिने कांस्य पदकाचा बहुमान पटकावला. आपल्या चार लढतींमध्ये तिने अनुक्रमे ताजिकिस्तान, चायनीज ताईपाई, इराण आणि उझबेकिस्तानच्या कुराशपटुना पराजित केले.
मलप्रभा जाधव हिने यापूर्वी राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर अनेक पारितोषिके मिळवली आहेत. गेल्याच आठवड्यात तिने राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी नोंदविली होती. आता बेळगावचे नांव लौकिक करून आशिया स्पर्धेत यश मिळविले आहे.
मलप्रभाला आई-वडिलांचे प्रोत्साहन तसेच प्रशिक्षक त्रिवेणी एम. एन. आणि जितेंद्र सिंग तसेच फिटनेस प्रशिक्षक ओमकार मोटार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.