सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शेटफळ नागा येथे एका परीट समाजाच्या श्री कृष्णा सोनटक्के यांनी इस्त्रीचे पैसे ग्राहकाला विचारले म्हणून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्याकरिता आज बेळगावातील मराठा रजक समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात त्यांनी मारहाण झालेल्या श्रीकृष्णा सोनटक्के यांना न्याय मिळावा अशी मागणी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोलापूर जिल्हाधिकारी यांना केली आहे.
सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी श्री कृष्णा महादेव सोनटक्के यांनी एका व्यक्तीकडून इस्त्रीचे पैसे मागितल्याने त्यांना जबर मारहाण करण्यात आली तसेच त्यांना रॉड आणि लाठीकाठीने हल्ला करण्यात आला या घटनेत ते गंभीर जखमी झाल्या आहेत.
तसेच श्रीकृष्ण सोनटक्के हे कुटुंबातील एकमेवकर्ता पुरुष असल्याने सोनटक्के कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन यावेळी मराठा रजक समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
याप्रसंगी मराठा रजक समाजाचे अध्यक्ष विठ्ठल पाळेकर उपाध्यक्ष मयूर चव्हाण गाडगेबाबा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विनायक पवार अध्यक्ष खानापूर तालुक्याचे लक्ष्मण पाळेकर लॉन्ड्री असोसिएशनचे पुंडलिक परीट यांच्यासह बेळगाव जिल्हा परिषद समाज आणि मराठा रजक समाजाचे सदस्य उपस्थित होते.