अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने आलेल्या श्रीराम अक्षता मंगल कलशाची चवाट गल्लीत ढोल ताशांच्या गजरात व जय श्रीराम च्या नार्यासह 14 मंगल कलशांची शोभायात्रा उत्साहात काढण्यात आली. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने आलेल्या मंगल अक्षता कलशाचे चवाट गल्लीत उत्साहात आगमन झाले.या कलशाचे भाविकांकडून पूजन करण्यात आले. चवाट गल्ली येथील श्री मारुती मंदिर देवस्थान येथून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. महिला डोक्यावर अक्षता कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.तसेच पारंपरिक वेशातील महिला, मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या शोभायात्रेत एक हजार हुन अधिक रामभक्त सहभागी झाले होते. जय श्रीराम च्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
श्रीराम दिंडी जात असलेल्या मार्गांवर सडा टाकून, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अंगणात दिव्यांची आरास करण्यात आली होती. घरोघरी कलशाचे पुजन करण्यात येत होते. ठिक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी तसेच फुलांच्या रांगोळ्या आणि पायघड्या घातल्या होत्या. हलगी, वारकरी संप्रदाय टाळ्यांच्या गजरात व धनगरी ढोल या सर्व वाद्यासह असंख्य चवाट गल्ली शेठी गल्लीच्या सहभागाने श्री राम अक्षता कलक्षाची मिरवणूक फुलांच्या वर्षावात पार पाडली. यावेळी श्री रामरक्षा पठण करुन आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला.या श्रीराम दिंडी व स्वागत यात्रेचा समारोप श्री मारुती मंदिर येथे झाला.
येथे झालेल्या मंगल कलश प्रदान कार्यक्रमात माजी आमदार अनिल बेनके यांनी आयोध्या संग्रामाची माहिती दिली. ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष शंकर बाबली महाराज यांनी आशीर्वाद पर शुभेच्छा दिल्या. या अभियानाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख संजय गुंडकल, तसेच गल्लीतील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.