बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या पीडीओ सुजाता बटकुकर्की यांच्यासह सेक्रेटरी प्रताप मोहिते यांनादेखील जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी निलंबित केले आहे. पीडीओ आणि सेक्रेटरीअभावी ग्राम पंचायतीच्या कामकाजावर परिणाम झाला असून विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे कंग्राळी बुद्रुकचे पीडीओ गोविंद रंगापगोळ यांच्यावर अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला असला तरी अद्यापही ते पंचायतीत दाखल झालेले नाहीत. तसेच सेक्रेटरीचीदेखील नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे तातडीने सेक्रेटरीचीदेखील नियुक्ती करावी,
अशी मागणी केली जात आहे. बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गणेशपूर येथील जयश्री बी शंकरानंद यांच्या मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे सदर प्रकरणात सामील असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार राज्य मानव हक्क आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा पंचायतीचे सीईओराहुल शिंदे यांनी उपकार्यदर्शी (विकास), जिल्हा पंचायत, कार्यकारी अधिकारी तालुका पंचायत सौदती, साहाय्यक संचालक (पंचायतराज), तालुका पंचायत खानापूर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.