बेळगाव शहरातील भाग्यनगर सेकंड क्रॉस येथील इंडियन बँक शाखेच्या लॉकर मधील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आले असून त्यांनी एकाला अटक करून त्याच्याकडील 14 लाख रुपये किमतीचे एकूण 143.9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव चंद्रकांत बालाजी जोर्ली (वय 32) असे आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये 2,41,053 रुपयांची 24.81 ग्रॅम वजनाची 24 कॅरेटची सोन्याची अंगठी, 2,47,855 किमतीची 25.51 ग्रॅम वजनाची 24 कॅरेट सोन्याची अंगठी, 2,36,973 रुपये किमतीची 24.39 ग्रॅम वजनाची 24 कॅरेट सोन्याची अंगठी,
1,54,594 रुपये किमतीची 15.73 ग्रॅम 22 कॅरेटची सोन्याची नेकलेस, 4,62,916 किमतीचे 46.89 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोन्याचे मंगळसूत्र आणि 56,609 रुपये किमतीची 5.76 ग्रॅम वजनाची 22 कॅरेट सोन्याची लॉकेट असलेली चेन अशा एकूण 143.9 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांचा समावेश आहे.
ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 14,00,000 रुपये इतकी होते. बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पोलीस उपायुक्त निरंजन राजेअरस आणि खडेबाजार उपविभागाचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी यांच्या नेतृत्वाखालील अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने उपरोक्त कारवाई केली. या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी तपास पथकाची प्रशंसा करून त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.
सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा बेळगाव पोलिसांनी लावला छडा
