गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगावातील काही गणेशोत्सव मंडळांनी येत्या 1 सप्टेंबर 2024 पासून मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपल्या मंडपांमध्ये नेण्याचे नियोजन करत आहेत . यापुढेही सुट्टीच्या दिवशी शहर व उपनगरात अनेक मंडळांचे आगमन सोहळे होणार आहेत.
शहरातील व प्रमुखतेने श्री विसर्जन मिरवणुक मार्गाचे रस्ते त्वरीत खड्डे दुरुस्त करावेत. प्रत्येक रस्त्यावर अनेक खड्डे आहेत ते दुरुस्त व्हावेत, विसर्जन मार्ग नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली,रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, टिळक चौक कपलेश्वर रोड हा संपूर्ण रस्ता मिरवणुकीचा दृष्टिने अत्यंत महत्वाचा आहे. यावर दोन तीन ठिकाणी डांबरीकरण रस्त्यावर दुरुस्तीचे काम करणे जरूरीचे असून शहरातील व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यावरील दुरुस्तीचे काम त्वरीत करण्यात यावे.
मात्र, गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मार्गातील लोंबकळणाऱ्या केबल, झाडांच्या वाढलेल्या फांद्या हटवाव्यात, तसेच मिरवणूक मार्गावरील अडथळे असलेले टिलोफोन खांब बदलावेत, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या गणपत गल्लीतील गाड्या हलविण्याबाबत उपाययोजना करावी आदी मागण्या लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या समितीने महानगरपालिका आयुक्त अशोक दुगुंडी व महापौर सविता कांबळे यांच्याकडे केली आहे.
गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या कालावधीत कुठलेही विघ्न येऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन सुरळीत होण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी महामंडळाने केली आहे.
अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती 15 फुटांपेक्षा उंच आहेत. त्यामुळे या मूर्ती मंडपामध्ये तसेच विसर्जनासाठी नेताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत. तसेच खड्डे बुजवल्यानंतर असमतोल झालेले रस्ते समप्रमाणात करावेत अशी मागणीही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राधान्याने केली आहे.
यावेळी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक मानपा गट नेते गिरीश धोंगडी, हेमंत हावळ, सुनिल जाधव, अरुण पाटील श्याम बाचुळकर,रवी कलघटगी, नितीन जाधव,प्रवीण पाटील, गजानन हांगीरगेकर,अर्जुन राजपूत, राजकुमार खटावकर, अजित जाधव, महेश सुतार आदी उपस्थित होते.