महाराष्ट्रातील यवतमाळ आणि पुणे येथील संस्थांची राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी निवड
नवी दिल्ली 15: केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेज्यांची घोषणा सोमवारी रात्री करण्यात आली. या पुरस्कारात महाराष्ट्रातील यवतमाळ व पुणे या जिल्ह्यातील विविध संस्थांनी महत्वाची भूमिका बजावली असून या दोन्ही जिल्ह्यांमधील संस्थांची निवड झाली आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने 38 पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. हे पुरस्कार नऊ विविध श्रेणींमध्ये प्रदान करण्यात येतील. यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, शहरी स्थानिक संस्था, शाळा-महाविद्यालये, उद्योग, पाणी वापरकर्ता संघ आणि नागरी संस्था आदिंचा समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये, प्रथम पारितोषिक ओडिशाला, उत्तर प्रदेश दुसरे तर गुजरात आणि पुद्दुचेरीने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले आहे.
महाराष्ट्रातील यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सर्वोत्कृष्ट उद्योगाच्या श्रेणीत तिसरे पारितोषिक जाहिर झाले आहे. तसेच पुण्यातील भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन(BAIF) डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन या संस्थेला सर्वोत्कृष्ट नागरी संस्थांच्या श्रेणीत पहिले स्थान प्राप्त झाले आहे. या यशामुळे महाराष्ट्राच्या पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानावर पुनश्च प्रकाश पडला आहे.
पुणे महानगरपालिकेला सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत तिसरे पारितोषिक जाहीर आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून राज्यातील पाणी व्यवस्थापन व संरक्षणाच्या क्षेत्रात असलेल्या उत्कृष्ट कामगिरीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
या पुरस्कारांचे वितरण समारंभ 22 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात होणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील.