अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक छळ केल्याप्रकरणी हुक्केरी पोलिसांनी एकजणास अटक केल्याची घटना घडली. गजबर मेहबूब तहसीलदार (वय २४, रा. मद्दीहळी, ता. हुक्केरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.आरोपी गजबर तहसीलदार हा सैन्य दलात सेवा बजावत आहे. तो त्याच्या गावातीलच होता. सदर विद्यार्थिनी एका हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत आहे. तिच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने ती मामाकडे राहत होती. सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे बसने हुक्केरीला बसस्थानकात उतरली. बसस्थानकावर थांबलेला आरोपी गजबर याने तुला शाळेत सोडतो, असे सांगून दुचाकीवरून जबरदस्तीने तिला शहराबाहेर घेऊन गेला. यावेळी शंका आल्याने श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून लैंगिक छळ करताना त्याला रंगेहात पकडून दोघांनाही हुक्केरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुलीचा आजोबा व मामा मारुती महादेव बन्ननवर यांनी हुक्केरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करून दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक अभिजीत ए. यांनी गुन्हा दाखल करून मंडल पोलिस निरीक्षक महांतेश बस्सापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू ठेवला आहे.