शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी लांबविणाऱ्या एका चोरट्याला मारीहाळ पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. कृष्णा उर्फ राजू अशोक रामण्णावर (वय २६, रा. नावगे, ता. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुळेभावी गावातील महालक्ष्मी मंदिराजवळून चोरुन ३० हजार रुपये किमतीची यामाहा दुचाकी ४ जुलै रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी मारीहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दुचाकीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. बेळगाव बागलकोट रस्त्यावर मोदगा गावाजवळ वाहनांची तपासणी करताना या पथकाला संशयित आरोपी नंबरप्लेटशिवाय दुचाकी चालविताना आढळला. पोलिसांनी संशयावरुन त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. बेळगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरल्याचे त्यानो सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त-चोरट्याला अटक
