बेळगांव ः येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिध्द विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन कुमार पाटील होते.
वैष्णवी नाडगौडा व तेजस्विनी शेट्टी यांच्या स्वागत गीताने सभेचा प्रारंभ झाला. यानंतर चेअरमन कुमार पाटील व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. तसेच सोसायटीच्या दिवंगत सभासदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
व्हाईस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी स्वागत केले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार सोसायटीची वाटचाल सुरू असून सचोटी, पारदर्शक व्यवहार व ग्राहकांना देण्यात येत असलेली सौजन्यपूर्ण वागणूक यामुळेच गेल्या चौदा वर्षांत सोसायटीने प्रगती केली, असे त्यांनी सांगितले.
चेअरमन कुमार पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात सोसायटीच्या सांपत्तिक स्थितीची माहिती दिली व यावर्षी सोसायटीला १५ लाख ४० हजारचा नफा झाला असून १२ टक्के लाभांश देण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच गत वर्षाचा अहवाल सादर केला.
यानंतर गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन सेक्रेटरी पद्मा बाडकर, नफातोटा व २०२४-२५ घ्या शिलकी पत्रकाचे वाचन संचालक अरविंद कुलकर्णी, नफातोटा विभागणीचे वाचन संचालिका नीता कुलकर्णी यांनी केले. २०२५-२६ चे अंदाज पत्रक संचालक संकेत कुलकर्णी यांनी सादर केले. ऑडिट रिपोर्टचे वाचन सल्लागार मंडळाच्या सदस्या रजनी गुर्जर यांनी केले. तसेच संचालिका पूजा पाटील यांनी २०२५-२६ साठी ऑडिटर नेमणुकीची सूचना मांडली. संचालक अविनाश कुलकर्णी यांनी नियमातील प्रस्तावित दुरुस्तीचे वाचन केले. त्याला सभासदांनी मान्यता दिली. संचालक अनंत शेट व कर्मचारी सोनम मंगनाकर यांनी जामीनदारांची जबाबदारी याविषयीची माहिती दिली.
यानंतर कंपनी सेक्रेटरी योगेश अंगडी यांचा सत्कार तसेच यंदाच्या दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परिक्षेत यश मिळविलेल्या सभासदांच्या गुणी पाल्यांचा रोख रक्कम व पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
प्रा. आनंद मेणसे, किशोर काकडे , रुपाली हवालदार व सविता गवस यांची यावेळी शुभेच्छापर भाषणे झाली. कर्मचारी अर्चना दरवंदर यांनी आभार मानले. चिन्मय शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. लोकमान्य रंगमंदिरात झालेल्या या सभेस सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.