बेळगाव येथील कंग्राळी बी.के. येथे गावातील नागरिकांची दिशाभूल करून धर्मांतराचे प्रयत्न सुरू असल्याच्या आरोपानंतर संतप्त ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी ग्रामपंचायतीला घेराव घातला. या प्रकरणात संबंधित व्यक्ती व संस्थेविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी गावात एका विशिष्ट धर्माचे प्रचारक म्हणून स्वतःला “धर्मगुरू” म्हणवणारी व्यक्ती वास्तव्यास आली होती. सुरुवातीला पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीबद्दल ग्रामस्थांनी शंका व्यक्त करून त्याला इशारा दिला होता. मात्र, नंतर त्याने गावात ‘येशू आधार केंद्र’ नावाची संस्था सुरू केली आणि धर्मांतराचे प्रयत्न सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
या संस्थेला सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी सहकार्य केल्याचे आरोपही ग्रामस्थांनी केले आहेत. धर्मांतराचे प्रकार वाढल्याने ग्रामस्थ आणि श्रीराम सेना हिंदुस्थान व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पंचायत कार्यालयात दाखल झाले व ग्रामपंचायत अध्यक्षांना निवेदन सादर केले.
निवेदनात “मरगाई नगर येथे सुरू असलेल्या संशयास्पद कार्यवाहीवर तात्काळ निर्बंध आणावेत आणि संबंधित संस्थेचे परवाने रद्द करावेत,” अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत अध्यक्षा रोहिणी बुवा यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊन सोमवारी निर्णय जाहीर केला जाईल.”
यावेळी ग्रामस्थानी सांगितले की
,“धर्मांतराच्या संशयासंदर्भात आम्ही ग्रामपंचायतीला जाब विचारण्यासाठी आलो. अशा व्यक्तींच्या कागदपत्रांची तपासणी करूनच परवाने द्यायला हवेत. आम्ही संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने कारवाईची मागणी केली असून, पंचायत अध्यक्षांनी पुढील चार दिवसांत कारवाईचे आश्वासन दिले आहे.”
या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



