अधिवेशनात चर्चा होत असतानाच मोबाईल हाती
राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था परिस्थिती व कारागृहात मोबाईल फोन व इतर सुखवस्तू सहज उपलब्ध कशा होतात, यावर बेळगावात सुरू असलेल्या अधिवेशनात चर्चा सुरू असतानाच हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात चार मोबाईल फोन आढळून आले आहेत. कारागृह अधिकाऱ्यांनी ते ताब्यात घेतले आहेत. कारागृहाचे अधिकारी बी. वाय. बजंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी पुढील तपास करीत आहेत. सर्कल नं. २ मधील आठव्या क्रमांकाच्या बराकीत असलेल्या शौचालयात मोबाईल आढळून आले आहेत. मंगळवार दि. १६ डिसेंबर रोजी सर्कल नंबर २ मधील आठव्या बराकीत अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता शौचालयाच्या दरवाजाच्या मागे कॅरम बोर्ड अडकवून त्यामध्ये मोबाईल लपवून ठेवल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी चार की पॅड मोबाईल व एक युएसबी केबल जप्त केली असून हे मोबाईल कोणाचे आहेत? याचा उलगडा झाला नाही.



