शिवाजी महाराजांची गुरुदक्षिणा
छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजामाता लहानपणापासून शिवाजीकडून नामजप करून घ्यायची. एका राजाला आवश्यक अशी सर्व युद्धकला जिजामातेने शिवाजीला शिकवली होती. जिजामाता आणि गुरु रामदास स्वामींच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी उत्तम राजा झाला. शिवाजीने मराठ्यांना मोगलांच्या विरुद्ध उभे केले. शिवाजीने आदर्श राज्याची स्थापना केली. शिवाजीने राज्याची स्थापना धैर्य, सहनशीलता इत्यादी आध्यात्मिक गुणांच्या बळावर केली.
एक दिवस शिवाजी महाराज राजदरबारात असताना कोणीतरी भिक्षा मागत असल्याचे ऐकू आले. हा आपले गुरू रामदास स्वामींचा ध्वनी आहे, हे जाणून लगेच धावून जाऊन त्यांना सन्मानाने आत घेऊन आले. गुरूंचे पूजन करून त्यांनी अन्न ग्रहण केल्यानंतर शिवाजी महाराजांनी एका चिठ्ठीत काहीतरी लिहून गुरूंना दिले. गुरुंसह असलेल्या इतर लोकांना याचे आश्चर्य वाटले. शिवाजी महाराज गुरूंना राजभोजन देऊ शकतात, अर्पण देऊ शकतात असे विचार करत होते; परंतु शिवाजी महाराजांनी लहानशा चिठ्ठीत काय लिहिले असेल, असे सर्वांना वाटले. हे ओळखून गुरूंनी लोकांच्या मनातील प्रश्नाला उत्तर देण्यासाठी त्यांच्यातील एकाला चिठ्ठीत काय आहे, हे जोरात वाचायला सांगितले. त्या चिठ्ठीत शिवाजी महाराजांनी त्यांचे संपूर्ण राज्य गुरुदेवांना अर्पण केल्याचे नमूद केले होते.
गुरुदेवांनी विचारले, ‘‘सर्व अर्पण करून टाकल्यावर तू काय करणार?’’ शिवाजी महाराज म्हणाले, ‘‘मी तुमची सेवा करत राहीन.’’ तेव्हा गुरुदेव म्हणाले की, ठीक आहे. तसे असेल तर चल आपण घरोघरी जाऊन भिक्षा मागूया. लगेच राजांनी आत जाऊन साधारण वस्त्रे धारण केली आणि गुरूंसह घरोघरी जाऊन भिक्षा मागितल्यानंतर सर्वजण विश्रांतीसाठी झाडाखाली बसले. शिवाजी महारांजांची गुरुसेवेची तळमळ बघून सर्वजण आश्चर्यचकीत झाले. गुरुदेव म्हणाले, ‘‘मला राज्याचा काय उपयोग ? म्हणून तू दिलेले राज्य मी ठेवून घेणार नाही. आजपासून मी तुझी माझे राज्य सांभाळण्यासाठी नेमणूक करतो.’’ नम्रतेने शिवाजी महाराज गुरूंच्या राजमहालात परत आले आणि त्यांचे राज्य सांभाळले. यावरून शिवाजी महाराज गुरूंवर आणि देवावर किती प्रेम करत होते, हे लक्षात येते. म्हणूनच त्यांनी आपले सर्व राज्य गुरूंना अर्पण केले. राजाने आपले राज्य देवाचे राज्य म्हणून सांभाळायचे आहे, हे यावरून लक्षात येते. आपल्याकडे शिवाजीमहाराजांइतकी संपत्ती नाही; तरीही आपण आपण देवाला आपली बुद्धी, मन अर्पण करू शकतो.
आधार : HinduJagruti.org
संग्रह
जिल्हा समिती सेवकांचे नाव: श्री. सुधीर हेरेकर
संपर्क क्रमांक : ९८४५८३७४२३