पंढरपूरची वारी
अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर ! पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी । संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ! पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर, कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णु यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो.
पंढरपूरच्या वारीचा प्रारंभ
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, अर्थात् पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली.
पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व !
विठुरायाच्या नामगजरात निघणार्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो, त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूलदेहही चंदनाप्रमाणे झिजतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात.
भगवान श्रीविष्णूचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती होय. ती केवळ साधी मूर्ती नाही, तर श्रीविष्णूचा सगुण देह आहे. पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात. कोणाचेही निमंत्रण नसतांना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने न्हाऊन निघतात. थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो, तेव्हा काही काळासाठी त्या जिवाची उन्मनी अवस्था झालेली असते. पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे.
वारकर्यांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते !
संत ज्ञानेश्वरांनी इ.स. 516 मध्ये वारी या व्रताचा प्रारंभ केला. तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृतावस्थेत आली आहे. वारकरी राम कृष्ण हरी । असे नामसंकीर्तन सतत करत पंढरीस जातात. कलियुगात ईश्वराची कृपा संपादन करणार्या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात, तेव्हा ती समष्टी साधना होते. वारीमध्ये व्यष्टीसह समष्टी साधनाही होते आणि सर्व जिवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते. या तीर्थाचा महिमाच असा आहे. येथील भक्तांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते. पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड झरा पाझरू लागतो. भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत अशीच चालू रहाणार आहे.
देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती पंढरपूरला येते !
भक्तांच्या संकटसमयी धावून येण्यासाठी, आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे. देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती घ्यायची असल्यास पंढरपूरला जावे.
पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून आदर व्यक्त करत
पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्स्वरूप झालेला असल्याने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. (पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात, उदा. दोहोंमधील चैतन्य एक होऊन दोहोंचेही तेज वाढण्यास साहाय्य होते. ‘मी’पणा, ताठा, अहंकार न्यून होतो. ‘सगळीकडे ईश्वर भरलेला आहे’, ही भावना बळावते.) आपले अनुभव सांगत, नवीन रचना (अभंग, भजने, ओव्या) म्हणून दाखवत. प्रसाराच्या नवीन कल्पना सांगत. इतरांना मार्गदर्शन करत. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत चालू आहे. थोडक्यात म्हणजे कार्तिकी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा देण्याचा अन् पुढील मार्गदर्शन घेण्याचा हा दिवस असल्याने या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले.’
संकलक – श्री. बापू सावंत
संपर्क – 78924 00185
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’
सौजन्य : सनातन संस्था