जानेवाडीत श्री ब्रम्हलिंग मंदिर लोकार्पण सोहळा उत्साहात
आई-वडील हे आपले दैवत आहेत. ज्याप्रमाणे आपण देव-देवतांची सेवा करतो त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचीही श्रद्धेने सेवा करणे काळाची गरज आहे. जर आई-वडिलांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपण या जगात कुठेच मागे राहू शकत नाही, असे प्रतिपादन म. ए. समितीचे युवा नेते आणि उद्योजक आर. एम. चौगुले यांनी केले.
जानेवाडी येथील श्री ब्रह्मलिंग मंदिर वास्तुशांती आणि लोकार्पण सोहळा आज शनिवारी उत्साहात पार पडला. याप्रसंगी उद्घाटक या नात्याने चौगुले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काळू नारायण गुरव हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मोनापा पावशे, कुमाण्णा गुरव, बाळू गुरव, मल्हारी गोजेकर, नारायण होनगेकर, गुंडू होनगेकर, नागेश पावशे, बाळू होसुरकर, मधु गुरव, दत्तू गुरव, पुन्हाप्पा गोजगेकर, एन. के. कालकुंद्री, एस. आर. कालकुंद्री, सागर कटगेण्णवर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा मंदिर कमिटीच्यावतीने भगवा फेटा आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर आर. एम. चौगुले यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
जानेवाडी येथे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून ब्रह्मलींग मंदिराची उभारणी करण्यात आली असून या मंदिराची वास्तुशांती आणि लोकार्पण सोहळा आज महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. यासाठी काल शुक्रवारी सायंकाळी कळस मूर्तीची गावातून मिरवणूक काढून सायंकाळी रक्षण होमहवन करण्यात आले. त्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आज शनिवारी सकाळी नवग्रह मूर्ती प्रतिष्ठापना, अभिषेक, कळसारोहण, होमवन, आणि दुपारी 3 वाजता मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. तसेच सायंकाळी या ठिकाणी माहेरवासिनींचा आहेर देऊन सत्कार करण्यात आल्यानंतर नामस्मरण व भारुडी भजनाचे आयोजन करण्यात आले. आता उद्या रविवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर लोकार्पण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक गोजेकर यांनी केले, तर आभार अनिल गोजेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.