नुकताच साजरा झालेला राष्ट्रिय डेंग्यू दिवस आणि आता सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्यावतीने गावात ‘डेंग्यू’ प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया आजार हमखास बळावतात. लोकांमध्ये या आजाराविषयी जागृती निर्माण हाेण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी प्राथमिक आरोग्य विभाग आणि आशा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गावामध्ये जनजागृती मोहीम राबविली. डेंग्यू आजाराविषयी सर्वसामान्य लोकांना माहिती देऊन प्रतिरोधक उपाययोजनांचा प्रसार करणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना अध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले.
एडिस डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छता आवश्यक आहे. बऱ्याचदा घरात, गॅरेजमध्ये, कार्यालयात रोज न लागणाऱ्या वस्तू बाहेर उघड्यावर कचऱ्यात फेकल्या जातात किंवा छतावर ठेवल्या जातात. त्यामुळे पावसाळ्यात त्यात पावसाचे पाणी साचते व आठवड्यानंतर डासांच्या अळ्या होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे निरुपयोगी सामानाची वेळीच विल्हेवाट लावणे अथवा ते झाकून ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यात पावसाचे पाणी साचणार नाही. घराच्या छतावर पावसाचे पाणी साचून राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी. घर, कॉलनी, अपार्टमेंटचा मोकळा परिसर आणि गटारी स्वच्छ ठेवाव्यात. अनावश्यक झुडपे काढावीत. टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे कॅन आदी पाणी साचणाऱ्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी.
‘डेंग्यू’ला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ‘आपले आरोग्य आपली जबाबदारी’ या ऊक्तीनुसार सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता घेण्याची विनंती सतीश पाटील यांनी गावातली नागरिकांना केली.
येळ्ळूर गावातील या मोहिमेअंतर्गत आशा कार्यकर्त्या घरोघरी जाऊन जनजागृती करून डेंग्यू रोखण्यासाठी नेमके काय करावे आणि काय करू नये याविषयी माहीत दिली. एकंदरित येळ्ळूर ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर आणि आशा कार्यकर्त्या यांच्या संयुक्त विद्यमाने ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रा. पं. सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि आशा कार्यकर्त्या तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.