जिल्ह्यातील अत्यावश्यक विकास कामे विशेष करून अनुसूचित जाती-जमातींच्या विकासाची कामे जातीने लक्ष घालून त्वरेने पूर्ण करत असल्याबद्दल बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांचा आज मंगळवारी सकाळी जिल्हा पंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला.
बेळगाव जिल्ह्यातील दलित संघटनांच्यावतीने हा सत्कार करण्यात आला. बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून अधिकार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हर्षल भोयर यांनी आपली कर्तव्य दक्षता दाखवत अनेक नागरी समस्या व तक्रारींचे निवारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली जनहितार्थ विकास कामे सत्वर पूर्ण केली जात आहेत. विशेष करून अनुसूचित जाती जमातीसह मागासवर्गीयांशी संबंधित विकास कामे प्रलंबित असल्यास जातीने लक्ष घालून ती कामे ते आठवड्याभरात पूर्ण करून देत आहेत. या त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल अनेक ग्रामपंचायती आणि तालुका पंचायतीमध्ये त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे. सदर कर्तव्यदक्ष आणि सत्वर सेवेबद्दल जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर यांचा आज विविध दलित संघटनांतर्फे जिल्हा पंचायत कार्यालयात म्हैसूरी पगडी, शाल, हार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बेळगाव जिल्हा कर्नाटक दलित संघर्ष समितीचे (आंबेडकरवादी) राज्य संचालक सिद्धाप्पा कांबळे, दलित नेते मल्लेश चौगुले, आनंद कोलकार आदींसह विविध दलित संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.