यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला प्रतिटन 5500 रु. भाव मिळावा या मागणीसाठी आज सोमवारी बेळगाव शहरात विविध शेतकरी संघटनांनी भव्य निषेध मोर्चा काढला.
सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी भरपावसात आपल्या मागण्यांसाठी सम्राट अशोक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या निषेध मोर्चात जोरदार घोषणा देत संताप व्यक्त केला.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चुन्नाप्पा पुजेरी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
गेल्या काही वर्षांपासून साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे उसाला प्रतिटन 5500 रु. दर देण्यात यावा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही शेतकरी नेत्यांनी यावेळी दिला. आंदोलनादरम्यान पोलिस विभागाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी पोलीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही काळ वादावादी झाली.
या निषेध मोर्चात शहरातील चन्नम्मा चौकात आंदोलक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याच्या मधोमध झोपून, हिरवी शाल फिरवत, डोक्याला स्कार्फ बांधून आम्हाला न्याय द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली.
यावेळी जिल्ह्यातील विविध शेतकरी व रयत संघटनांचे नेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.