कपिलेश्वर रोड आणि महाद्वार रोड कॉर्नर येथील गटार बांधकामासाठी खोदण्यात आलेला रस्ता पूर्ववत करण्यात न आल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन रस्त्यावरील दगड मातीचा ढिगारा धोकादायक ठरू लागला होता. या परिसरात असलेल्या श्री कपिलेश्वर देवस्थानात दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या नागरिकांचा तोल जाऊन पडण्याच्या घटनाही घडल्या होत्या. शिवाय अनेक लहान सहान अपघात देखील घडले आहेत. याप्रकरणी नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी कंत्राटदाराला पाठपुरावा करून सदर मातीचा ढिगारा हटविण्याची विनंती केली होती.
नगरसेविका वैशाली भातकांडे, सिद्धार्थ भातकांडे आणि या परिसरातील नागरिकांनी संबंधित कंत्राटदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची ताकीद देताच आणि यासंदर्भातील वृत्त झळकतात याची दखल घेत मातीचे ढीग हटविण्यात आले.
कपिलेश्वर रोड आणि महाद्वार रोड कॉर्नर येथील गटारीचे बांधकाम करण्यासाठी सदर खोदकाम करण्यात आले होते. आता गटार बांधकाम होऊन एक महिना उलटला तरी खोदण्यात आलेला रस्ता पुन्हा पूर्ववत करण्यात आलेला नव्हता. रस्त्यावरील मातीच्या ढिगासह दगड धोंडे हटविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या रस्त्यावर मोठा अडथळा निर्माण होऊन उंच सखल दगड मातीच्या ढीगामुळे वाहन चालकांना वाहने हाकताना मनस्ताप सहन करावा लागत होता.
दगड मातीचा ढिगारा ओलांडताना वाहन चालकच नव्हे तर पादचारांनाही कसरत करावी लागत होती. रात्रीच्या वेळी तर अंदाज न आल्यामुळे दुचाकी वाहन चालकांचे किरकोळ अपघात होण्याचे प्रकारही घडले आहेत. या परिसरातील दगड मातीचा ढिगारा हटविण्यात आला असून रस्ता पूर्ववत झाला आहे.